‘द्रुतगती’वरही उतरणार विमान?

सुधीर साबळे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पिंपरी - गेल्या आठवड्यात लखनौ-आग्रा महामार्गावर भारतीय हवाई दलाचे विमान उतरविण्यात आले होते. तशाप्रकारचा प्रयोग पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर राबवता येऊ शकतो का, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी द्रुतगती मार्गावरील उर्से आणि खालापूर या दोन ठिकाणांची माहिती रस्ते विकास महामंडळाने लष्कराला दिल्याचे कळते.

पिंपरी - गेल्या आठवड्यात लखनौ-आग्रा महामार्गावर भारतीय हवाई दलाचे विमान उतरविण्यात आले होते. तशाप्रकारचा प्रयोग पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर राबवता येऊ शकतो का, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी द्रुतगती मार्गावरील उर्से आणि खालापूर या दोन ठिकाणांची माहिती रस्ते विकास महामंडळाने लष्कराला दिल्याचे कळते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोणत्या ठिकाणी असा प्रयोग राबवणे शक्‍य आहे, या संदर्भात लष्कराने रस्ते विकास महामंडळाकडून माहिती मागवली होती. द्रुतगती मार्गावर बोगदे असून, अनेक भागांत वळणांचा रस्ता आहे. मात्र उर्से आणि खालापूर या भागातील रस्ता सरळ असल्यामुळे त्या ठिकाणांची माहिती लष्कराला देण्यात आली आहे. लष्कराकडून या भागाचे सर्वेक्षण आणि चाचणी झाल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

दरम्यान, या संदर्भात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले म्हणाले की, द्रुतगती मार्गावर विमान उतरवणे शक्‍य आहे की नाही, हे त्या भागाची पाहणी केल्यानंतरच निश्‍चित केले जाऊ शकते. विमान उतरविण्यासाठी किमान पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता हा सरळ असायला हवा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असता कामा नये. विमान ज्या रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे, तो भक्‍कम स्थितीत असणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बऱ्याच ठिकाणी दुभाजक आहेत. रस्त्याच्या मध्यभागी झाडेदेखील आहेत. विमान उतरवताना रस्त्याचा मधला भागही मोकळा असणे गरजेचे असते. त्यामुळे या ठिकाणी हा उपक्रम राबवणे शक्‍य आहे का, हे या रस्त्याचे सर्वेक्षण केल्यानंतरच ठरू शकते. द्रुतगती मार्ग तयार करताना त्याची बांधणी कशा पद्धतीने झाली आहे, त्यावर विमान उतरू शकते का, याची चाचपणीदेखील तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

बारा महामार्गांवर विमान उतरवता येणार - गोखले
विमान उतरू शकेल, अशा पद्धतीने देशातील महामार्ग तयार करण्यात येत आहेत. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १२ महामार्गांवर हा प्रयोग सहजपणे राबवता येणे शक्‍य होणार आहे. नव्याने तयार होत असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर विमान उतरवणे शक्‍य होईल, अशा प्रकारची सोय करण्यात येणार आहे. भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर त्या वेळी महामार्गावर विमान उतरवण्याचा प्रयोग हा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, असेही एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news aeroplane landing on express way