बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बाणेर ते हिंजवडीदरम्यान नवीन रस्ता तयार करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केले आहे; मात्र नवीन रस्त्यासाठी जमीन जाणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून या प्रस्तावाला विरोध होत असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बाणेर ते हिंजवडीदरम्यान नवीन रस्ता तयार करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केले आहे; मात्र नवीन रस्त्यासाठी जमीन जाणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून या प्रस्तावाला विरोध होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्यात एमआयडीसीने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांची सुनावणी घेतली. त्या वेळी काही जणांनी जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या रकमेची, तर काही जणांनी एफएसआय, टीडीआर देण्याची मागणी केली. स्थानिक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या या मागण्यांमुळे हा प्रश्‍न सोडवायचा कसा हा प्रश्‍न एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. 

हिंजवडीमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित नवीन हिंजवडी, माण, म्हाळुंगे या मार्गे बाणेरपर्यंत जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा रस्ता हिंजवडीमधून कात्रज, कोथरूड, सिंहगडरोड या भागामध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी अधिक सोईस्कर व वेळेची बचत करणारा आहे. तसेच सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता मार्गी लावण्याचा प्रयत्न एमआयडीसीकडून सुरू असला, तरी त्याला अद्याप यश मिळाले नाही. रस्त्यासाठी आवश्‍यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा रस्ता तयार होऊ शकणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या बाणेर ते हिंजवडी या नवीन रस्त्याचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न एमआयडीसीकडून सुरू आहे. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. 
- संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक अधिकारी- दोन, एमआयडीसी

हिंजवडीमध्ये नवीन रस्त्याची आवश्‍यकता आहे. एमआयडीसीचा हा प्रश्‍न राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मांडणार असून, त्या संदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करणार आहे. 
- श्रीरंग बारणे, खासदार

Web Title: pimpri pune news baner-hinjwadi road oppose by farmer