दानवे पुन्हा घेणार झाडाझडती

दानवे पुन्हा घेणार झाडाझडती

पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर भाजपच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी पदाधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन दिवाळीनंतर आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ही मुदत संपल्याने लवकरच ते पुन्हा आढावा बैठक घेणार आहेत.

आगामी लोकसभेसाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मिशन ३५०’चे उद्दिष्ट दिले आहे. त्याला अनुसरून शहर पदाधिकाऱ्यांवर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षवाढीसाठी विस्तारक योजना जाहीर केली होती. पण, ती पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही.

पंधरा दिवसांपूर्वी स्वत: दानवे व राष्ट्रीय सहसंघटक व्ही. सतीश यांनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पण, त्याला सहापैकी अण्णा गर्जे, अरुण पवार, संतोष लांडगे, अजय पाताडे या चार मंडल अध्यक्षांनी दांडी मारली होती; तर रवींद्र इंगवले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने केवळ एकच मंडलाध्यक्ष या वेळी उपस्थित होता. ‘गैरहजर असलेल्या मंडल अध्यक्षांना काम करायचे नसेल तर त्यांना घरी पाठवा’, असा इशारा दानवे यांनी बैठकीत दिला होता. परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

बूथ नेमणुका, मंडल कार्यकारिणी, आघाडींची नियुक्ती या सर्वच कामांबाबत पक्षात अंधार आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जाणार, असे म्हणत दानवे यांनी शहराध्यक्षांपासून सर्वांचेच कान उपटले होते. विस्तारक योजनेचे तीन-तेरा वाजलेले आहे. मंडल कार्यकारिणी नियुक्तीची जबाबदारी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्याकडे, तर विविध आघाडीच्या सदस्य नियुक्तीची जबाबदारी माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतु अद्याप मंडल कार्यकारिणी नियुक्तीचे काम पूर्ण झालेले नाही. नगरसेवकांकडे बूथ सदस्य नियुक्‍त्या सोपविण्यात आल्या आहेत. त्याचा तपशील अद्याप तयार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार सोळापैकी चौदा आघाड्यांच्या सदस्यांची नियुक्ती सदाशिव खाडे यांनी केली आहे. त्यात सहकार, अल्पसंख्याक, शिक्षक, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती, विद्यार्थी, शेतकरी आदी आघाड्यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष आठवडाभरात तारीख निश्‍चित करून शहर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावतील. या बैठकीपूर्वी कामाचा लेखाजोखा प्रदेशाध्यक्ष दानवे यांना सादर करावा लागेल.

जुने कार्यकर्ते सत्तेपासून दूर
राज्यात भाजप सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आली आहेत, तरी विशेष कार्यकारी दंडाधिकारी, महामंडळांच्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत, त्यामुळे पक्षात एकप्रकारची मरगळ आली आहे. जुने कार्यकर्ते पक्षशिस्त पाळतात; परंतु इतर पक्षांतून आलेल्यांना पक्षशिस्त माहिती नाही. जुन्या कार्यकर्त्यांना योग्य मान-सन्मान दिला जात नाही. निर्णय घेताना त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. महापालिकेत जुन्या कार्यकर्त्यांना दूर ठेवले जाते. त्यामुळे ते सत्तेपासून दूर आहेत. त्यांच्यात मोठी नाराजी आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आगामी आढावा बैठकीत जुन्यांची नाराजी दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
कामशेत - पंचवीस वर्ष भाजपचा गड राखूनही सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून मावळ तालुक्‍याला मंत्रिपद मिळाले नाही. आता तिसऱ्या विस्तारात तरी मावळला मंत्रिपद मिळेल का? या आशेवर कार्यकर्ते आहेत. भेगडे यांना मंत्रिपद द्यावे, असे साकडे मावळातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना घातले आहे. 

आमदार बाळा भेगडे यांनी तालुक्‍यातील पंचवीस वर्ष भाजपचा गड सुरक्षित ठेवला. त्यामुळे नियोजित मंत्रिमंडळ विस्तारात बाळा भेगडे यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्‍यातील ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन भेगडे यांच्यासाठी विनंती केली आहे. गेल्या साठ वर्षाच्या काळात ज्येष्ठ नेते मदन बाफना यांच्या रूपाने तालुक्‍यात पहिले मंत्रिपद मिळाले. त्यानंतर आजतागायत नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मावळला मंत्री पद देण्याची घोषणा अनेक मंत्र्यांनी केली होती. परंतु दोन्ही विस्तारात डावलले गेले. ही शेवटची संधी असल्याने तालुक्‍यातील अनेक नेत्यांनी भेगडे यांना मंत्रिपद द्यावे, अशी विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com