बीआरटी मार्ग लवकर पूर्ण करावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पिंपरी - मोरवाडी सायन्स पार्क चौकातील रखडलेला बीआरटी मार्ग लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

पिंपरी - मोरवाडी सायन्स पार्क चौकातील रखडलेला बीआरटी मार्ग लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी ते देहू-आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या बीआरटी मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ठिकठिकाणी वेगात सुरू आहे; परंतु मोरवाडी येथील सायन्स पार्क चौक ते आयुक्त बंगला या दरम्यान काही लघुउद्योजकांचे वर्कशॉप्स असल्याने तीन वर्षांपासून हा रस्ता बंद आहे. लघुउद्योजकांचे पुनर्वसन करून रखडलेले काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. त्यावर तोडगा निघत नसल्याने या टप्प्यातील बीआरटी रस्त्याचे काम झालेले नाही. 

या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. 

औद्योगिक परिसरातील कामगारांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असल्याने त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अथवा सायन्स पार्क चौकात उड्डाण पूल बांधून बीआरटी मार्ग मोकळा करावा, अशीही सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली.  ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, पक्ष प्रवक्ते फजल शेख, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, संगीता ताम्हाणे, शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांचा त्यात समावेश होता. 

Web Title: pimpri pune news BRT Route