जातीच्या दाखल्यावरील निकालाची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणी झाली. समितीने महापौर काळजे आणि तक्रारदार घनश्‍याम खेडकर या दोघांची बाजू ऐकून घेतली. मात्र, निकाल राखून ठेवला.

पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणी झाली. समितीने महापौर काळजे आणि तक्रारदार घनश्‍याम खेडकर या दोघांची बाजू ऐकून घेतली. मात्र, निकाल राखून ठेवला.

महापौर काळजे यांना समितीच्या दक्षता पथकाने ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे ‘क्‍लीन चिट’ दिली, ती कागदपत्रे सादर करावी, अशी भूमिका तक्रारदार खेडकर यांचे वकील ॲड. गणेश भुजबळ यांनी २६ जुलैला झालेल्या सुनावणीत मांडली होती. दरम्यान, गुरुवारी समितीसमोर झालेल्या सुनावणीत ॲड. भुजबळ यांनी महापौरांनी सादर केलेल्या विविध कागदपत्रांबाबत हरकत घेतली. काळजे यांच्या जात दाखल्याबाबत अन्य तक्रारदारांनी म्हणणे मांडले.

महापौरांच्या वतीने ॲड. अमित आव्हाड यांनी युक्तिवाद केला. महापौरांच्या कुणबी जातीच्या दाखल्याबाबत खेडेकर यांच्यासह अन्य तक्रारदारांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. समितीच्या दक्षता पथकाचे चौकशी अधिकारी एस. डी. घार्गे यांनी महापौर काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत यापूर्वी ‘क्‍लीन चिट’ दिली आहे. तसा अहवालदेखील त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केला. मात्र, हा अहवाल समितीने नाकारला. काळजे यांनी सादर केलेल्या स्वतःच्या व वडिलांच्या शालेय दाखल्यात जातीची नोंद मराठा आहे. त्याशिवाय, त्यांनी सादर केलेल्या जन्म-मृत्यू नोंद पुराव्यातील पुरावाधारकांशी त्यांचे नातेसंबंध सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष जात पडताळणी समितीने काढला होता. तसेच, काळजे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध का ठरवू नये, याचा खुलासा सादर करण्याबाबत त्यांना २० जुलैला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दाखल्याबाबत मी यापूर्वी पुरावे दिले आहेत. खापर पणजोबाच्या काळापासूनचे वंशावळीचे पुरावे आहेत. जात पडताळणी समितीने आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मात्र, निकाल राखून ठेवला.
- नितीन काळजे, महापौर

महापौर काळजे यांनी जात पडताळणी समितीकडे कुणबी जात दाखल्याबाबत सादर केलेल्या पुराव्यांबाबत आमची हरकत आहे. आम्ही व अन्य तक्रारदारांनी जात पडताळणी समितीकडे म्हणणे मांडले. आता निकालाची प्रतीक्षा आहे.
- घनश्‍याम खेडकर, तक्रारदार

Web Title: pimpri pune news caste certificate resuly waiting