पुढाऱ्याच्या ‘शेंडी’नेच ‘संस्कार’ची डबघाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सुमारे ३५ हजार महिलांचे गुंतले १८० कोटी 

पिंपरी - कायदेशीर अडचणीतील गुंतागुंतीच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात बड्या राजकीय पुढाऱ्याने मोठी ‘शेंडी’ लावल्यानेच संस्कार ग्रुप मोठ्या आर्थिक गर्तेत सापडल्याचे आज काही गुंतवणूकदारांकडून समजले. दरम्यान, संस्थेच्या व्यवहारामुळे विविध महिला बचत गटांच्या तब्बल ३५ हजार महिलांचे मिळून १८० कोटी रुपये गुंतून पडल्याचे आज प्रथमच समोर आले.

सुमारे ३५ हजार महिलांचे गुंतले १८० कोटी 

पिंपरी - कायदेशीर अडचणीतील गुंतागुंतीच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात बड्या राजकीय पुढाऱ्याने मोठी ‘शेंडी’ लावल्यानेच संस्कार ग्रुप मोठ्या आर्थिक गर्तेत सापडल्याचे आज काही गुंतवणूकदारांकडून समजले. दरम्यान, संस्थेच्या व्यवहारामुळे विविध महिला बचत गटांच्या तब्बल ३५ हजार महिलांचे मिळून १८० कोटी रुपये गुंतून पडल्याचे आज प्रथमच समोर आले.

एक जमीन, दोन व्यवहार
संस्कार ग्रुपची सर्वांत मोठी गुंतवणूक ही जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील आहे. शहर परिसरातील जमिनीत हा पैसा अडकून पडला. चाकण, राजगुरुनगर, चऱ्होली, आळंदी, लोहगाव, हिंजवडी, तसेच सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्‍वर अशा विविध ठिकाणी भूखंड आहेत. लोहगाव येथील प्लॉटिंगच्या व्यवहारात ज्याच्याकडे जबाबदारी सोपविली त्याने संस्थेचे पैसे हडप केले. 

दुसऱ्या एका मोठ्या व्यवहारात एकच जागा दोघांना विकल्याने पैसे अडकले.
आळंदी येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्रीत एका बड्या पुढाऱ्याने खरेदीखत करून घेतले. जागेचा ताबाही मारला; मात्र पैशाला ‘शेंडी’ लावली. अशा व्यवहारांमुळे संस्था पुरती गाळात गेल्याचे सांगण्यात आले. 

पैसे पाहिजेत, तक्रार नका करू गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल करू नये, यासाठी एजंट लोकांनी दबाव वाढवला आहे. या संदर्भात आज दुपारी संस्कार कार्यालयाशेजारील इमारतीत प्रमुख एजंटांची बैठक झाली. त्या वेळी ठेवीदारांचा असंतोष शमविण्यासाठी पैसे परत करू, अशी ग्वाही देण्याचे ठरले. त्यासाठी आळंदी येथील ११ एकर जागेत दोन हजार सदनिकांची गृहयोजना तयार करायची. त्यातील एक हजार सदनिकांची २५ लाखाला एक याप्रमाणे विक्री करून जमा होणारे पैसे परत करायचे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला. एका प्रमुख एजंटाने ही माहिती ‘सकाळ’ प्रतिनिधीला दिली.
 

कष्टकऱ्यांचे १८० कोटी
संस्कार अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीमध्ये रोजची गुंतवणूक करणाऱ्या महिला बचत गटांची संख्या मोठी आहे. अन्य पतसंस्था अथवा बॅंकेपेक्षा अधिक व्याज (सुमारे १५ ते २४ टक्के) मिळते म्हणून महिला एजंटनेच ही रक्कम गोळा केली आहे. त्यात घरकाम, शेतमजूर, धुणीभांडी करणाऱ्या महिलांचे बचत गट आहेत. परिसरातील गावे, तसेच शहरातील चाळीत राहणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश आहे. अशा गुंतवणूकदार महिलांची संख्या सुमारे ३५ हजार असून त्यांची अडकलेली रक्कम तब्बल १८० कोटी रुपये आहे.

तक्रारींची वाढतेय संख्या

दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यांत तक्रारींची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी सहा गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली असून, त्याची संख्या २७ लाख ५० हजार आहे.

संस्कार ग्रुपच्या आमिषांना बळी पडून शेकडो बचत गट, मुदत ठेव, रिअल इस्टेटमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी करोडो रुपये गुंतवणूक केलेले आहेत. गुंतवणूकदारांना मुदत संपूनही पैसे परत मिळाले नाहीत. फसवणूक झालेल्यांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांची रक्कम तब्बल पाच कोटींवर आहे. 

मंगळवारी दाखल तक्रार
राजगुरुनगर येथील किशोर कोरे यांनी एक लाख, नामदेव सुतार यांनी दहा लाख, सुनील सरजिने यांनी साडेपाच लाख, चंद्रकांत तांबे यांनी एक लाख, गहुंजे येथील काळूराम बोडके यांनी पाच लाख व मालती सावळे यांनी पाच लाख अशा प्रकारे २७ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार मंगळवारी संस्कार ग्रुपविरोधात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, संस्कार ग्रुपच्या विरोधात तक्रारदारांची संख्या वाढत आहे. मात्र, तक्रार घेण्यासाठी एकच कर्मचारी असल्याने अनेक तक्रारदारांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
बुधवारपासून एक अधिकारी, दोन कर्मचारी, दोन संगणकांची सुविधा दिघी पोलिस ठाण्यात उपलब्ध करून देणार आहोत. वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला पाठवण्याचा विचार आहे. फसवणूक झालेल्या कोणत्याही तक्रारदाराला परत पाठवले जाणार नाही. सर्वांच्या तक्रारी घेतल्या जातील. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार द्यावे, असे सहायक पोलिस आयुक्त वसंत तांबे यांनी सांगितले.

संस्कार ग्रुपमध्ये एक लाख गुंतवणूक केली. मात्र, मुदत संपूनही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने तरी पैसे परत मिळतील. त्यामुळे दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
- किशोर कोरे, गुंतवणूकदार

मी दहा लाख गुंतवले आहेत. अन्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे संस्कार ग्रुपमध्ये गुंतवले आहेत. लोकांना ते मिळावेत हीच विनंती आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पावती दिली जात नाही. पावती लगेच मिळायला हवी.
- नामदेव सुतार, गुंतवणूकदार

‘प्राप्तिकर’कडून चौकशी?

गुंतवणूकदारांना मोठ्या व्याजाचे आमिष दाखविणाऱ्या संस्कार ग्रुपची चौकशी करण्याचे काम प्राप्तिकर खात्याने सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजते. यामध्ये किती गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत, याची तसेच अन्य माहिती जमविण्याचे काम सुरू केले आहे. या ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेली बऱ्यापैकी रक्‍कम रोख स्वरूपात असल्याची माहिती समोर आल्याने त्या संदर्भात सखोल चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

गुंतविलेल्या रकमेवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार असल्याच्या आशेवर शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, हॉटेलचालक, निवृत्त कर्मचाऱ्यांनी पैशाची गुंतवणूक केली. मात्र, त्यांच्या हातात व्याज तर सोडा मुद्दलही मिळालेली नाही. या संदर्भात तक्रार करण्यासाठी पुढे येण्यास कोणी धजावत नाही. येथे गुंतवणूक आणणाऱ्या एजंटांना कमिशनपोटी देण्यात येणारी रक्‍कमही मोठी होती. त्यामुळे या ठिकाणी झालेला प्रत्येक व्यवहार प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आल्याचे समजते. 

अधिकृत ठिकाणी गुंतवणूक करीत असताना प्राप्तिकर खात्याने पॅनकार्ड क्रमांक देणे सक्‍तीचे केले आहे. मात्र, अशा ठिकाणी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारांना व्याजाचे आमिष दाखवले जाते, त्यामुळे इथे होणारे व्यवहार रेकॉर्डवर येत नाहीत. काही दिवसांपूर्वी पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचे केवायसी करण्याच्या सूचना प्राप्तिकर खात्याकडून देण्यात आल्या होत्या. गुंतवणूकदारांकडून ठेव घेताना त्याचा पॅन क्रमांक आणि अन्य माहिती घेण्यात यावी, असे प्राप्तिकर खात्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, अनेक पतसंस्थांनी अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. मोठ्या व्याजाचे आमिष दाखविणाऱ्या संस्था प्राप्तिकर खात्याकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यामुळे त्याचे संस्थापक आणि गुंतवणूकदारांनी तिथे गुंतवलेली रक्‍कमेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र, अत्याधुनिक यंत्रणेमुळे त्याची माहिती मिळविणे सहज शक्‍य होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

Web Title: pimpri pune news cheating by leader