निर्धार स्वच्छतेचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य केले. 

पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य केले. 

विसर्जन घाटापासून मोरया गोसावी मंदिराजवळील जिजाऊ पर्यटन केंद्राकडे जाणारा रस्ता या वेळी स्वच्छ करण्यात आला. त्यात महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, मोरेश्‍वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, गजानन चिंचवडे, महापालिकेचे सहआयुक्‍त दिलीप गावडे, सहायक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरणसंवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, सूर्यकांत मुथियान, विलास देशपांडे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, पतंजलीचे हिरामण भुजबळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप जाधव, विलास लांडगे, डॉ. गिरीश आफळे आदी उपस्थित होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

आयुक्‍त हर्डीकर, उपमहापौर मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सावळे आणि गिरीश प्रभुणे यांनी विचार व्यक्‍त केले.  विसर्जन घाटावर सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. नवरात्रोत्सवानंतर पवना घाटावर आणि नदीपात्रात निर्माल्य टाकले होते. पाण्यात साठलेल्या निर्माल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. नागरिक, नगरसेवक, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची स्वच्छता केली. स्वच्छतेसाठी एकाच वेळेस अनेक हात राबल्यामुळे अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा परिसर एकदम निर्मळ झाला. पर्यावरणसंवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील स्वच्छतेचे काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देत होते.  घाट स्वच्छ केल्यानंतर तेथून मोरया गोसावी मंदिराकडील जिजाऊ पर्यटन केंद्राकडे जाणारा अर्धा किलोमीटरचा रस्ताही अर्ध्या तासात स्वच्छ करण्यात आला. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम दहापर्यंत सुरू होती. उद्यानामध्ये आयुक्‍तांच्या उपस्थितीत या मोहिमेचा समारोप झाला. 

स्वच्छतेसाठी सरसावल्या अनेक संस्था-संघटना 
लायन्स क्‍लब ऑफ पुणे-भोसरी, भावसार समाज पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, फेडरेशन ऑफ घरकुल, पोलिस नागरिक मित्र, शहर युवक काँग्रेस, एकनिष्ठ युवा मंच, समर्थ युथ क्‍लब, संजना तुपे, डॉ. अभिजित भालशंकर, महेश गावडे, एसएफजेकेपी ग्रुप, पर्यावरण संवर्धन समिती, डी. व्ही. घुगे, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, प्रा. मारुती शेलार, सोहम योग साधना, ज्येष्ठ नागरिक महासंघ, स्नेहल गार्डन हाउसिंग सोसायटी, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र-आकुर्डी, समर्थ रंगावली, लायन्स क्‍लब ऑफ पुणे-आकुर्डी, केशव कुकडे, मैत्रीय परिवार, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन-थेरगाव, भाजप चित्रपट कामगार आघाडी, मयूर हाउसिंग सोसायटी, राजमल मुनोत, योगदान प्रतिष्ठान-चिंचवडगाव, चापेकर स्मारक समिती, वासुदेव को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, सुदर्शन नागरिक संघटना, पोलिस मित्र संघटना, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, एक पुस्तक गावासाठी, महिला दक्षता पोलिस कमिटी, सायकल मित्र परिवार, वृक्ष मित्र परिवार, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ, लायन्स क्‍लब ऑफ पिंपरी, अंजू सोनवणे, कवी कैलास भैरट, विकास पाटील, विनय मोने, गोविंद चितळकर, राहुल श्रीवास्तव.

‘शहरासाठी रविवारी द्या प्रत्येकाने दोन तास’
शहरात कोणत्याही परिसरात अस्वच्छता दिसू नये यासाठी महापालिकेने दोन तास शहरासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांनी स्वच्छतेसाठी वेळ देऊन परिसर कचरामुक्त करावा, यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या वेळी महापौर नितीन काळजे, महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते. 

‘सकाळ’ माध्यम समूह आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयुक्‍तांनी ही माहिती दिली. महापालिकेकडून तीन महिन्यांत शहर चकाचक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेण्याची आवश्‍यकता आहे. नागरिकांचा सहभाग वाढल्यास हा उपक्रम अगदी सहजपणे यशस्वी होणे शक्‍य होणार आहे. प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत नागरिकांनी पुढे येऊन स्वच्छतेसाठी वेळ द्यावा, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. महापालिका प्रशासनाकडून या उपक्रमासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याचे हर्डीकर यांनी नमूद केले. दोन तास शहरांसाठी हा उपक्रम कशा प्रकारे राबवायचा याची रूपरेषा महापालिकेकडून लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आयुक्‍त म्हणाले...
 पुढल्या तीन महिन्यांत पिंपरी- चिंचवड स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आणणार.
 स्वच्छता लोकचळवळ होण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढण्याची आवश्‍यकता आहे. 
 महापालिकेकडून शहरातील कचरा उचलण्याच्या व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा काढली आहे. ती आठ वर्षांसाठी राहील. 
 खासगी संस्थेच्या माध्यमातून हे सर्व काम करण्यात येणार असून, त्यासाठी शहराची दोन भागांत विभागणी केली आहे. सुरवातीला खासगी संस्था महापालिकेच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी वापरणार आहेत, त्या बाद झाल्यानंतर खासगी संस्था त्यांच्या गाड्या वापरणार आहेत. 
 कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्याची निविदा काढली आहे. महापालिकेने ६०० मेट्रिक टन कचऱ्यामधून वीजनिर्मिती करण्याचे निश्‍चित केले आहे. 
 शहरात निर्माण होणाऱ्या राडारोड्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्याची नवीन व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरात राडारोडा पडणार असेल, तर संबंधितांनी त्याची सूचना महापालिकेला द्यायची आहे. त्यानंतर तो उचलण्यासाठी आवश्‍यक असणारी यंत्रणा पुरविण्यात येणार आहे. 
 शहर हागणदारीमुक्‍त करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड इव्हिनिंग’ पथकांच्या संख्येत वाढ करणार आहे. 
 सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्‍न सोडवण्यास पालिका प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. 
 शहरात एक ई-टॉयलेट सुरू केले असून, अशा प्रकारची आणखी चार स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. शहरातील निर्जन परिसरात अशा प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन आहे. 
 घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
 नागरिकांनी ओला कचरा घरात जिरवून, कंपोस्ट खताची निर्मिती करून त्याचा वापर उद्यान, कुंड्यांना हे खत वापरण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. 
 पुढील तीन महिन्यांत हा उपक्रम मार्गी लावण्याचे नियोजन आहे. 

Web Title: pimpri pune news cleaning campaign