शिवसेनेत अस्वस्थता; कार्यकर्ते चलबिचल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पक्षाला मंत्रिमंडळात स्थान नसल्याने अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर 

पक्षाला मंत्रिमंडळात स्थान नसल्याने अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर 

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (ता. ३) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने या पक्षात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असतानाच, पिंपरी- चिंचवडमध्ये मात्र शिवसेनेत चलबिचल सुरू झाली असून, काही माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेशाची फिल्डिंग लावली आहे. हे पदाधिकारी चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विभागातील आहेत. भाजपने या सर्वांना प्रवेश दिल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला, तरी त्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. लोकसभेपाठोपाठ किंवा त्याबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकांत संधी मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत संधी डावलल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. सात ते आठ प्रमुख कार्यकर्ते, तसेच माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आपला गड भक्कम करण्याच्या दृष्टीने तयारीला लागला आहे. शिवसेनेतून येणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये संधी दिली जाऊ शकते. भाजप शहराध्यक्षांच्या इशाऱ्याची ते वाट पाहात आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्राधिकरणातील राजेश फलके यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला, आता त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांचे पदाधिकाऱ्यांशी पटत नसल्याने ते भाजप गोटात वावरताना दिसतात. शिवसेनेचे श्रीरंग बारणे मावळचे खासदार आहेत, तसेच सेनेचेच गौतम चाबुकस्वार हे पिंपरीचे आमदार आहेत. दोन बडे नेते असताना पक्षात पडझड सुरू झाली आहे.

शहरप्रमुख राहुल कलाटे आणि बारणे हे एकमेकांना पाण्यात पाहतात. पक्षातील एक गट शहरप्रमुख बदलासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरा पक्षातून बाहेर पडण्याची भाषा करतो. शहरप्रमुख बदलल्यानंतर येणाऱ्या नव्या प्रमुखापुढे संघटना बांधणीचे मोठे आव्हान असेल. शिवसेना खिळखिळी झाली असल्याने महापालिका निवडणुकीत त्यांना अनेक ठिकाणी उमेदवारदेखील मिळाले नव्हते. परिणामी सध्याच्या लोकप्रतिनिधींनाही शिवसेनेत असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेचे बडे नेते भाजपच्या गळाला लागले, तर आश्‍चर्य वाटू नये.

Web Title: pimpri pune news confussion in shivsena activists