वर्षभरात दीड लाख वाहनांवर कारवाई

रवींद्र जगधने
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पिंपरी - पुणे शहरासह पिंपरी- चिंचवडमधील चौकात लाल सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग ओलांडणाऱ्या एक लाख 58 हजार 679 बेशिस्त वाहनांवर एक एप्रिल 2016 ते 31 जुलै 2017 दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई केल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेने माहिती अधिकारात दिली.

पिंपरी - पुणे शहरासह पिंपरी- चिंचवडमधील चौकात लाल सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग ओलांडणाऱ्या एक लाख 58 हजार 679 बेशिस्त वाहनांवर एक एप्रिल 2016 ते 31 जुलै 2017 दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई केल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेने माहिती अधिकारात दिली.

शहरातील चौकात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई केली जाते. संबंधित वाहनांच्या क्रमांकावर पोलिसांच्या वाहतूक प्रणालीवर दंड आकारला जातो. वाहन पोलिसांनी पकडल्यास, तसेच वाहन क्रमांकाची पडताळणी केल्यास दंड दिसून येतो व पोलिस तो वसूल करतात. अशा पद्धतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून किती वाहनांवर कारवाई केली, याबाबत "सकाळ'च्या बातमीदाराने माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज केला होता. त्यावर उत्तर देताना वाहतूक शाखेच्या जन माहिती अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त जयश्री गायकवाड यांनी ही माहिती दिली.

कारवाईत अनियमितता
पिंपरी चौकात लाल सिग्नल लागल्यानंतर एका पोलिसाने त्याचे वाहन पुढे नेण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबलेल्या वाहनचालकांवर दबाव आणून वाहने पुढे घेण्यास भाग पाडले होते. या घटनेच्या 30 मिनिटे जवळपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून किती वाहनांवर कारवाई केली, याची आकडेवारी माहिती अधिकारात मागवली होती. मात्र, या वेळेत झेब्रा क्रॉसिंग ओलांडणाऱ्या एकही वाहनावर कारवाई केली नसल्याचे उत्तर देण्यात आले.

एकाही सरकारी वाहनावर कारवाई नाही
नियम सर्वांसाठी समान असतात. मात्र, पीएमपी बस, तसेच पोलिसांसह अनेक सरकारी वाहने झेब्रा क्रॉसिंग ओलांडतात, तसेच सिग्नलही तोडतात. मात्र, वर्षभरात शहरातील एकाही चौकात एकही सरकारी वाहन नियम तोडताना सीसीटीव्हीत दिसलेले नसल्याचे माहिती अधिकारात सांगण्यात आले.

सरकारी वाहनांनाही नियम
पोलिसांसह कोणत्या सरकारी वाहनांना वाहतूक नियमात सूट आहे, असल्यास कोणत्या कलमाद्वारे ही सूट आहे, याची माहिती मागविली होती. मात्र, ही माहिती वाहतूक शाखेकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले.

Web Title: pimpri pune news crime on 1.5 lakh vehicle