सायकल शेअरिंगचे पुणे मॉडेल पिंपरीतही?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे-मुंबई महामार्गावर साडेचार मीटरचा पदपथ अस्तित्वात आहे. त्यापैकी अडीच मीटर सायकल ट्रॅकसाठी आहे. या मार्गावर काही ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, ती हटविण्यात येतील.
- श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता

पिंपरी - पुणे शहरात काही ठिकाणी सायकल शेअरिंगचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायकल शेअरिंगचे हे पुणे मॉडेल पिंपरी-चिंचवड शहरातही राबवावे, अशी मागणी गुरुवारी (ता. २२) ‘सीईई’ (सेंटर फॉर एन्व्हॉयर्न्मेंट एज्युकेशन) या संस्थेने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. त्यानुसार बीआरटी विभागास याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्‍तांनी केली.

महापालिका भवनात झालेल्या या बैठकीस सीईईच्या संस्कृती मेमन, प्रांजली देशपांडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे महापालिकेने ‘पुणे सायकल आराखडा २०१७’ तयार केला आहे. बीआरटी किंवा मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एखाद्या ठिकाणी उतरल्यानंतर तेथून जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. या सुविधा निर्माण करताना पर्यावरणाचाही विचार करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार स्टेशनपासून सायकल शेअरिंग हा पर्याय उत्तम असून, पर्यावरणपूरकही आहे. पुणे सायकल शेअरिंगचे हे मॉडेल पिंपरी-चिंचवड शहरातही राबवावे, अशी मागणी त्यांनी केली. 

सायकल शेअरिंग हा प्रकल्प संपूर्णपणे महापालिकेने राबवायचा, की महापालिकेने अर्थसाह्य करून खासगी संस्थेस चालविण्यास द्यायचा, सायकल शेअरिंग पॉइंट कुठे उभारता येईल, कोणकोणत्या कंपन्या सहभागी होऊ शकतात, त्यासाठी लागणारी जागा आणि अर्थसाह्य कोण देणार? याचा अहवाल देण्याची सूचना आयुक्‍तांनी बीआरटी विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांना दिल्या. पुढील महिन्यात सीईईबरोबर होणाऱ्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गांवर सायकल ट्रॅककरिता जागा सोडण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या उंचीपेक्षा जादा उंचीवर, काही ठिकाणी छोटे दुभाजक लावून स्वतंत्र सायकल ट्रॅक निर्माण केला आहे. काही ठिकाणी रस्त्याला वेगळा रंग देऊन सायकल ट्रॅककरिता जागा सोडली आहे. नव्याने काम सुरू असलेल्या भक्‍तीशक्‍ती उद्यान ते किवळे, पुणे ते आळंदी या मार्गावरही सायकल ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे.’’

Web Title: pimpri pune news cycle sharing pune model