वसाहतीतील ढोलकी पोचली रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सुरवातीला आवड म्हणून मी ढोलकी वाजवायचो. ‘सकाळ’मध्ये आलेल्या बातमीमुळे मी ढोलकीवर लक्ष केंद्रित केले व माझी वेगळी ओळख निर्माण झाली. मला वादनकला व लोकसंगीतातच करिअर करायचे आहे. आई- बाबांनाही माझा निर्णय योग्य वाटला. मला लोकसंगीताचा अभ्यास करायचा आहे.
- विजय कापसे, ढोलकीवादक

पिंपरी - ‘ढोलकीच्या तालावर विजयची भरारी’ ही बातमी पाच वर्षांपूर्वी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विजयवर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. संगीत क्षेत्रात करिअर करण्याची दिशाही गवसली. आता विजय शहरातील सुपरिचित ढोलकीवादक झालाय. तो व त्याची ढोलकी रुपेरी पडद्यावर पोचली आहे. नुकत्याच झालेल्या एका संगीत नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा त्याच्याशी संवाद साधला.

विजय आता हिंदुस्थान थिएटर कंपनी व रंगपंढरी या नाट्य संस्थांमध्ये कार्यरत आहे. या स्पर्धेत रंगपंढरीचा संघ विजयी झाला. पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात तो आत्मविश्‍वासाने वावरू लागला आहे. लवकरच तो परदेशांतही कला सादर करणार आहे. स्वतःच्या कमाईतून त्याने गिटार, तबला, ढोलक ही वाद्ये खरेदी केली आहेत. विजय अजूनही पिंपरीतील वसाहतीतच राहतो. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा तो सातवीत होता. त्या बातमीमुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्याला अनेक ठिकाणी ढोलकी वादनासाठी बोलावले. आता तो अनेक मोठ्या कार्यक्रमांत, नावाजलेल्या कलाकारांना ढोलकीची साथ करतो. तो तबल्याचे प्रशिक्षणही घेत आहे व महाविद्यालयीन शिक्षणही सुरू आहे.

संजीवनी महिला शाहिरी पथक, तानसेन संगीत विद्यालय, शिवप्रेमी कला मंच, तसेच अनेक शाहिरांना ढोलकीची साथ करतो. त्याचे प्रशिक्षक राजेंद्र आहेर यांच्या माध्यमातून तो दूरदर्शनपर्यंत पोचला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ या स्पर्धेत तो अंतिम फेरीपर्यंत पोचला. त्याने पिंपरी- चिंचवडचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेसाठी राज्यातून ४० स्पर्धक निवडले होते. विजय महाअंतिम फेरीपर्यंत गेला. प्रसिद्ध ढोलकीवादक विजय चव्हाण, पखवाजवादक प्रताप पाटील, सुरेखा पुणेकर या दिग्गजांसमोर विजयला सादरीकरणाची संधी मिळाली. विजय संगीतातच करिअर करणार आहे. तो गिटारही शिकत आहे. त्याने ढोलकीसोबत गिटार, तबला, ढोलक ही वाद्ये खरेदी केली आहेत. या कलेतून तो घराला हातभार लावतो. आता शहरात आणि वसाहतीत विजयची वेगळी ओळख झाली आहे. युवा ढोलकीवादक ही ओळख त्याने स्वबळावर मिळवली आहे, हे अभिनंदनीय आहे. ढोलकीवादनाच्या कलेतून विजय आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे.

Web Title: pimpri pune news dholaki on screen