थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्‍यांत महावितरणने घरगुती, व्यापारी, औद्योगिक व कृषिपंपधारक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. ग्राहकांनी थकीत वीजबिलाचा त्वरित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले आहे. अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सद्यपरिस्थितीत पुणे विभागात घरगुती, व्यापारी तसेच औद्योगिक वर्गवारीतील सहा लाख 84 हजार 567 ग्राहकांकडे 170 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात पाच लाख 81 हजार 340 घरगुती ग्राहकांकडे 107 कोटी 39 लाख, व्यापारी वर्गवारीतील 89 हजार 720 ग्राहकांकडे 43 कोटी 61 लाख, तर 13 हजार 507 औद्योगिक ग्राहकांकडे 19 कोटी 15 लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने, या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
याशिवाय पुणे परिमंडळातील थकबाकीदार कृषिपंपधारकांना एप्रिल 2017 पासूनच्या बिलाचा भरणा केला नसल्यास कृषिपंपाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्‍यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेली आहेत.

दरम्यान, शहर आणि ग्रामीण भागातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (ता 28) व रविवारी (ता. 29) सुरू ठेवण्यात येणार आहेत. चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाईल ऍपद्वारे सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी बिलाचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: pimpri pune news electricity disconnect to arrears customer