फिटनेसबाबत अंधानुकरण नको

फिटनेसबाबत अंधानुकरण नको

पिंपरी - आजच्या ‘ग्लॅमरस’ युगात आकर्षक दिसण्यासाठी ‘फिटनेस फ्रिक’ तरुण-तरुणींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. आकर्षक व फीट दिसण्याच्या या स्पर्धेमध्ये तरुणांमध्ये ‘मिल रिप्लेसर’, ‘ट्रॅश डाएट’, ‘स्किनी’, ‘स्किपिंग ऑफ मिल’ हे शब्द परवलीचे झाले आहेत. त्यातही ‘नो शुगर चॅलेंज’ या आहारप्रकाराबद्दल तरुणाईमध्ये सध्या प्रचंड ‘क्रेझ’ असून, ‘वॉट्‌सॲप’, ‘फेसबुक’, ‘ट्‌विटर’सारख्या ‘सोशल मीडिया’वरही त्यावर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे फिटनेसबाबत अंधानुकरण नको, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जीम करताना नाशिकमधील तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजीच आहे. एका तरुणीचाही व्यायामादरम्यान मृत्यू झाल्याची घटना वसईमध्ये गेल्या मंगळवारी (ता.२७) घडली. त्यापाठोपाठ तरुणांमधील फिटनेस फंडा या विषयाला तोंड फुटले. हा फिटनेस केवळ व्यायाम आणि डाएटपुरता मर्यादित न राहता 

त्यामध्येही अनेक उपप्रकार आले आहेत. नो शुगर चॅलेंज हा त्यातीलच एक प्रकार. ‘हेल्थ कॉन्शस’ महिला व मुली त्याकडे विशेष आकर्षित झाल्या आहेत. ‘मेंटेन’ राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ टाळण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. मात्र, या नव्या ‘चॅलेंज’मध्ये गोड पदार्थांसह नैसर्गिकरीत्या शर्करा असलेले पदार्थच वर्ज्य केले जातात. नव्हे, तर त्याचे परस्परांना आव्हान दिले जाते. कित्येकदा महिनोंमहिन्यांसाठी हे आव्हान स्वीकारून ते पेललेही जाते. फळांपासून फळभाज्यांपर्यंतच्या घटकांचा त्यामध्ये समावेश असतो.

‘फिटनेस फ्रिक’ (वेड्या) युवावर्गाचे हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अनेक ‘फिटनेस’ गुरूंनी शर्करायुक्त पदार्थांच्या मोठमोठाल्या याद्या ‘शेअर’ केल्या असून, ‘गुगल’सारख्या ‘सर्च इंजिनवर त्या सर्वांत वरच्या स्थानावर आहेत. त्या व्यतिरिक्तही ‘नो शुगर चॅलेंज’च्या आयडिया, ‘शॉपिंग लिस्ट’, ‘चॅलेंज’ स्वीकारण्यापूर्वी आणि नंतर, परिणाम, ‘मेनू’, ‘मिल प्लॅन’ असे अनेक फंडे देण्यात आले आहेत. त्याच्या ‘फालोअर्स’ची संख्या लक्षणीय आहे. 

‘‘आपल्याकडे प्रति दहामागे दोन रुग्ण या प्रकारातील म्हणजेच ‘फिटनेस’चा अतिरेक करणारे येतात,’’ अशी माहिती सार्वजनिक आहार पोषण तज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून ‘नो शुगर चॅलेंज’ने तरुणाईला वेड लावले आहे. मात्र, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. परदेशातून आलेल्या या ‘फॅड’चे आपल्याकडे अंधानुकरण केले जात आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्याही उद्‌भवू लागल्या आहेत. शरीरातील बहुसंख्य प्रक्रियांसाठी साखर हा मुख्य घटक आहे. ती बंद केल्याने सूक्ष्म घटक संतुलन बिघडून संपूर्ण आरोग्य बिघडते.’’ 

अतिरिक्त डाएटचे दुष्परिणाम
अँटिऑक्‍सिडंटचे प्रमाणे घटते
चयापचय क्रिया मंदावते
कामाची क्षमता कमी होते
शरीरातील सूक्ष्म पोषकाचे कुपोषण होते
असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो 
रोग प्रतिकारशक्ती कमी होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com