‘रॉबिनहूड’कडून अन्नसेवा

सागर शिंगटे
गुरुवार, 13 जुलै 2017

पिंपरी  - अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेले आहे. मात्र, अनेक हॉटेल्स, खानावळींमधून मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. तेच शिल्लक अन्न वाया घालवू न देता उपाशी असलेल्या अनाथ व गरीब आबालवृद्धांच्या मुखात घालण्याचे कार्य ‘रॉबिनहूड’ संस्थेचे शहरातील स्वयंसेवक स्वेच्छेने करीत आहेत. प्रसंगी स्वतःच्या घरून किंवा ‘पॉकेटमनी’ काढून अन्नदान करीत आहेत.

जादाचे किंवा शिल्लक अन्न वाया जाऊ नये, या प्रमुख उद्देशाने दिल्लीत रॉबिनहूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे देशभरात कार्य चालू आहे. त्याच अंतर्गत, पिंपरी- चिंचवड शहरातही आधुनिक ‘रॉबिनहूड’ हे अन्नसेवा करत आहेत. या संस्थेशी शहरातील जवळपास चारशे जण जोडले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. हे सर्वजण २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. ‘रॉबिनहूड आर्मी’चा शिलेदार गौरव देशमुख म्हणाला, ‘‘आपले घर, लग्नकार्य, केटरिंग, महाविद्यालयीन उपाहारगृहे, हॉटेल्स, घरगुती खानावळी यांमधून खूप अन्न वाया जाते. ते भुकेल्या व्यक्तींना देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. दर शुक्रवारी शहरातील निरनिराळ्या भागांत जाऊन आम्ही ही अन्नसेवा करत आहोत. पुरेसे अन्न न मिळाल्यास आमचे सदस्य स्वतःच्या घरातील अन्न किंवा ‘पॉकेटमनी’ काढून अन्नसेवेचे कार्य करत आहेत. कस्पटे वस्ती, भोंडवे कॉर्नर, शिंदे वस्ती, एचए मैदानावरील वस्ती अशा ठिकाणी आम्ही अन्नसेवा दिली आहे. मात्र, या लोकांना विनामूल्य जेवणाची किंवा कष्ट न करता खाण्याची सवय लागू नये म्हणून दर आठवड्याला अन्नसेवेचे ठिकाण बदलले जाते.’’

स्वातंत्र्यदिनी व्यापक अन्नसेवा!
येत्या १५ ऑगस्टला व्यापक प्रमाणावर अन्नसेवा केली जाणार आहे. त्यासाठी अधिक माहितीसाठी राजकुमार राठी (९४२२९८७५०८) आणि गौरव देशमुख (८६९८२०५४०३) यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेची रॉबिनहूड आर्मी डॉट कॉम या वेबसाइटवरही इच्छुक संपर्क करू शकतात.

Web Title: pimpri pune news food service by robinhood organisation