पालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे - बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. पुराव्यानिशी ते सिद्ध केल्यास कारवाई करू, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांचे आरोप गुरुवारी खोडून काढले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविषयीच्या तक्रारींसंदर्भात पालिकेतील पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या संत तुकारामनगर येथील स्थानकाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'सत्तेपासून दूर गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून ते आरोप करत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी केलेले आंदोलन हे समाज प्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी होते. आमचा विकासाचा अजेंडा ठरलेला आहे.''

मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीविषयी बापट म्हणाले, 'निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार होण्यास आठ दहा महिने लागतील. त्यानंतर त्याला केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागेल. त्यामुळे पिंपरीपर्यंतचे काम पूर्ण होत आले, की निगडीची मंजुरी दृष्टिक्षेपात येईल.''

मेट्रो प्रकल्पासाठी जागा मिळविण्यासाठी मी विविध विभागांच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या. परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी चर्चा करून जागांविषयीचे निर्णय घेतले. महापालिका आयुक्त आणि मेट्रोचे अधिकारी यांच्या बैठका घेऊन स्थानिक विषयांतील अडचणी दूर केल्या. स्वारगेटला मोठे ट्रान्स्पोर्ट हब करत आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या पाच-सहा खात्यांशी संवाद साधावा लागत आहे. मेट्रोच्या कामाची प्रगती समाधानकारक आहे. खडकीत संरक्षण विभागाकडूनही जागा मिळण्यात काही अडचणी नाहीत, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

पुणे-मुंबई महामार्गावर सब-वे - बापट
पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस पूल ओलांडल्यानंतर बोपोडीकडे जाण्यासाठी सब-वे करण्यात येईल. त्यासंदर्भात दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांबरोबर तीन बैठका झाल्या आहेत. हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्यात येत आहेत. त्यासाठी नदीकाठची झोपडपट्टी स्थलांतरित करण्यात येत असून, त्यांना पर्यायी जागा देण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

Web Title: pimpri pune news girish bapat talking