ग्रीन आयटीयन्स मोहिमेला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्ष लागवड 
पिंपरी - वीकेंड म्हणजे मौजमजा..धमाल..मस्ती अशी सर्वसाधारणपणे ‘आयटी’ कर्मचाऱ्यांची जीवनशैली. या जीवनशैलीला फाटा देत काही निसर्गप्रेमी ‘आयटीयन्स’नी मात्र ‘ग्रीन आयटीयन्स’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ते ‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्षांची लागवड करत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी सहा ते सात मोहिमा राबविल्या आहेत. 

पुण्यातील विविध ‘आयटी’ कंपन्यांसह हिंजवडीतील ‘आयटीयन्स’चाही त्यात समावेश आहे. सुधीर संचेती यांनी सर्वप्रथम ही कल्पना मांडली. ती त्यांच्या मित्रपरिवाराने उचलून धरली. त्यातून प्रायोगिक तत्त्वावर उंड्री येथे वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, आपल्यासारख्या अन्य आयटीयन्सनाही त्यात सहभागी होण्याची संधी देण्याच्या दृष्टीने ‘सोशल मीडिया’वरून आवाहन करण्यात आले. विशेषतः त्याला अनेक ‘आयटीयन्स’नी सकारात्मक प्रतिसाद दिला. उंड्रीनंतर हनुमान टेकडी, कोथरूड येथे राबविल्या गेलेल्या मोहिमांतून प्रतिसाद वाढत गेला. १५ जणांच्या सहभागातून सुरू झालेल्या मोहिमेचे आज शंभरहून अधिक सभासद आहेत. तथापि, मोहिमेला कोणताही व्यावसायिक, राजकीय रंग मिळू नये, असाही त्यांचा प्रयत्न आहे. किंबहुना, हेच या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. ‘आयटीयन्स’चे हे प्रामाणिक प्रयत्न लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोपे वाहून नेण्यापासून, खड्डे खणण्यापर्यंतची कामे ते उत्साहाने करत आहेत. 

आयटीयन्सची शनिवारची सकाळ सत्कारणी लागावी, या हेतूने ही मोहीम हाती घेतल्याचे संचेती सांगतात. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना निरंजन आढाव म्हणाले, ‘‘अनेकदा बहुतांश आयटीयन्सची शनिवारची सकाळ रिकामी जाते. हा मोकळा वेळ उपयोगी पडावा, यासाठी आम्ही १५ मित्रांनी दर शनिवारी सकाळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एकत्र येत असतानाच वृक्षारोपणाची संकल्पना पुढे आली. बघता बघता त्याचा प्रतिसाद वाढला. या पुढेही ही मोहीम विविध प्रकारे सुरूच ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वृक्षारोपण करण्यात येत असले, तरी यापुढे शनिवारची सकाळ विविध क्षेत्रासाठी देणार आहोत. अर्थात, मोहिमेतील ‘ग्रीन’ या शब्दाशी प्रामाणिक राहण्याचाही आमचा कायम प्रयत्न असेल.’’ 
 
घरापासूनच सुरवात 
मुळात ही वृक्ष लागवड अनेक आयटीयन्स आपल्या घरापासूनच सुरू करतात. फळे खाल्ल्यानंतर त्यातील बियांची पेरणी ते घरातील कुंड्यांमध्ये करतात. त्यातून निर्माण झालेली रोपे ते आजूबाजूच्या परिसरात लावतात. 

Web Title: pimpri pune news green iteans campaign