हिरकणी कक्षाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची हलगर्जी

संत तुकारामनगर, पिंपरी - एस. टी. आगारातील हिरकणी कक्ष
संत तुकारामनगर, पिंपरी - एस. टी. आगारातील हिरकणी कक्ष

वल्लभनगर एसटी स्थानकावर उत्तम सुविधा; मात्र प्रतिसादाचा अभाव

पिंपरी - इथे कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, तिथे बाळाच्या स्तनपानासाठी कक्ष कुठून आणायचा?, असा उद्‌धट आणि तिरकस प्रतिसवाल पिंपरी रेल्वे स्थानकाच्या एका अधिकाऱ्याने करत तमाम लेकुरवाळ्या प्रवासी महिलांचाच अवमान केला. पुणे आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ अस्तित्वात असताना, या अधिकाऱ्याने माहिती देण्याचे टाळून ‘स्तनपान’ हा विषयच मोडीत काढला. 

ऑगस्टचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून पाळला जातो. त्या पार्श्‍वभूमीवरच ‘सकाळ’चे प्रतिनिधी हिरकणी कक्षाबाबत माहिती घेण्यासाठी गेले असता, हा अनुभव आला. पिंपरी रेल्वे स्थानकावरून दररोज दोन एक्‍सप्रेससह २६ लोकल धावतात. त्यातून दिवसाला एकूण दहा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये महिलांचे प्रमाण ४० ते ५० टक्के असते. त्यामध्ये सर्वच वयोगटातील महिलांचा समावेश असतो. असे असताना, या ठिकाणी स्तनपानासाठी हिरकणी कक्ष आहे, किंवा नाही, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांने  मूळ प्रश्‍नाला बगल देत उद्‌धटपणा केला. 

संकल्पना
२००६ मध्ये ‘ला लेशे लीग’(अमेरिकन मदर सपोर्ट ग्रुप)ने सहा खंडांतील जवळजवळ ३५ देशांमधील करिअर करणाऱ्या मातांच्या स्फूर्तिदायक कथा एकत्रित पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या. या पुस्तकाचे नाव ‘हिरकणीज्‌ डॉटर्स’ (हिरकणीच्या मुली) असे ठेवण्यात आले. तसेच हिरकणीच्या बुरूजाचे चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले. हिरकणीचा वारसा जपला जावा, यासाठी ‘ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’ने ‘हिरकणी कक्षाची’ संकल्पना विकसित केली.

वल्लभनगर स्थानकात २०१३ पासून कार्यरत
पिंपरी रेल्वे स्थानकाच्या अगदी उलट आणि सकारात्मक चित्र वल्लभनगर एसटी स्थानकामध्ये पाहायला मिळाले. राज्यातील सर्व एसटी स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच म्हणजे २०१३ मध्ये वल्लभनगर आगारात हा कक्ष स्थापन करण्यात आला. त्यामध्ये सर्व सोयीसुविधाही देण्यात आल्या. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर झाली. तथापि,  या कक्षाबाबत महिलांमध्ये जागृती नसल्याने त्याला हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी सांगितले. 

सहा महिने पूर्ण होईपर्यंत निव्वळ स्तनपान (अंगावरील दुधाव्यतिरिक्त काहीही नाही, अगदी पाणी, पारंपरिक  औषधे, जीवनसत्त्वाचे थेंब किंवा कॅल्शिअमही नाही) देणे व त्यानंतर पूरक आहारासोबत कमीत कमी दुसऱ्या  वाढदिवसापर्यंत स्तनपान सुरू ठेवणे आवश्‍यक असते. मात्र, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये माता आणि  वैद्यकीय क्षेत्रासमोरील हे मोठे आव्हान आहे. तरीदेखील, प्रसुतीपूर्वीच्या तीन महिन्यात संबंधित मातेला  स्तनपानाचे महत्त्व समजावणे आवश्‍यक आहे. तसेच, बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एक तासामध्ये स्तनपान  करण्याचा आग्रह मातांनी धरला पाहिजे. 
- डॉ. राम गुडगिला, सार्वजनिक आहार व पोषण तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com