थोडी खुशी, थोडा गम

थोडी खुशी, थोडा गम

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्‍न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८ नगरसेवकांमध्ये तब्बल ७७ भाजपचे आहेत. अशा प्रकारे गल्ली ते दिल्ली अगदी घसघशीत पाठबळ भाजपच्या मागे आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती. ती जवळपास संपली. याचे कारण लोकांना भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, पारदर्शक, गतिशील कारभार हवा आहे. गुन्हेगारीपासून संपूर्ण मुक्ती हवी आहे. लोकसभा नंतर विधानसभा आणि वर्षापूर्वी महापालिका त्यासाठीच मतदारांनी भाजपकडे सोपविली. गेल्या तीन वर्षांतील ‘काय साधले, काय राहिले’ याचा लेखाजोखा मांडला तर, बऱ्यापैकी प्रश्‍न सुटले आणि आजही असंख्य मोठे प्रश्‍न आ वासून उभे आहेत; हे मान्य करावे लागेल. पूर्वीपेक्षा विकासकामांचा वेग वाढला, पण निधीची चणचण आहेच. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबरच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने शहराचे राजकीय वजन वाढले आहे.

अनधिकृत बांधकाम, शास्तीकर
अगदी कळीचा बनलेला अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न फडणवीस सरकारने एकदाचा मार्गी लावला. परंतु अद्याप बहुतांशी लोक त्याबाबत संभ्रमात आहेत. पावणे दोन लाख लोकांचा प्रश्‍न सुटला, असा कांगावा केला. प्रत्यक्षात प्राधिकरण, एमआयडीसी, रेडझोनमधील लाखभर अनधिकृत बांधकामांना त्यांचा काडीचा फायदा होणार नाही. नदी पूररेषेतील आणि आरक्षणातील अनधिकृत बांधकामे वाचविता येणे कठीण आहे. फक्त पूररेषेतील जागेचा मोबदला मिळणार हीच एक समाधानाची बाब. थोडक्‍यात प्रश्‍न अर्धाच सुटला आहे. दुसरीकडे नव्याने अनधिकृत बांधकामे पुन्हा नव्या जोमाने वाढत आहेत आणि त्यांना आशीर्वाद काही भाजपच्याच नेत्यांचा आहे.

शास्तीकराची बिले पाहून ६८ हजार घरमालकांची झोप उडाली. त्यातील ५०० चौरस फुटांच्या आतील बांधकामांना अभय मिळाले, इतकीच आश्‍वासनपूर्ती झाली. स्मार्ट सिटीमध्ये पूर्वी डावलण्यात आले होते, आता समावेश झाला. त्याचा लाभ फक्त पिंपळे गुरव, सौदागर, निलख, वाकड परिसराला होणार. हा दुजाभाव लोकांना खटकतो. मेट्रोचे काम पिंपरीच्या बाजूने वेगात सुरू झाले आहे. चार वर्षांत मेट्रो धावली, तर त्याचे श्रेय भाजपला मिळेल. बीआरटीचे भिजत घोंगडे पूर्वी आणि आताही कायम आहे. अनेक कामे रखडली; त्यावर आळी मिळी गुपचिळी आहे.

एसआरए, रिंगरोड, पवना जलवाहिनी
राष्ट्रवादीच्या काळात झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनात मोठा घोटाळा झाल्याचा डांगोरा भाजपने पिटला होता. आजही त्यातील अर्धे प्रकल्प बंद स्थितीत आहेत. त्याचा निकाल लावला पाहिजे. रिंगरोडच्या प्रश्‍नाला भाजपने हात घातला, हे बरे केले. मात्र, त्यातून ८०० कुटुंबे बेघर होणार असतील तर, ते महागात पडू शकते. या लोकांच्या पुनर्वसनावर भाजप अद्याप बोलत नाही. पवना जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रश्‍नावर पूर्वी भाजपने राजकीय पोळी भाजून घेतली. आता त्यात समन्वय साधणे तीन वर्षांत जमले नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, तीनही मतदारसंघात स्वतंत्र तहसील कार्यालय, पुरवठा विभाग करण्याचे आश्‍वासन दिले; पण त्यावर घोषणेच्या पलीकडे कागद हालला नाही.

लष्कराच्या कचाट्यात सापडलेल्या बोपखेलवासीयांना स्वतंत्र रस्त्याचे आश्‍वासन मिळाले; पण आजही त्यावर तोडगा निघालेला नाही. केंद्राच्या अखत्यारीतील भोसरी, तळवडे रेडझोन प्रश्‍नावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले; पण ते बदलताच काम थंड पडले. मोशी कचरा डेपोचा बफर झोन ५०० मीटरचा १०० मीटर केला, ही एक जमेची बाजू झाली. नदीसुधार प्रकल्पावर पूर्वीसारखाच आताही घोषणांचाच पाऊस आहे. कृती शून्य आहे. कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मात्र, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

अजूनही वेळ गेलेली नाही
तीनही आमदारांच्या हातात अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. सत्तांतर झाल्याने शहराला अनेक फायदे झाल्याचा दावाही ते आपापल्या परीने करतात. काही ठोस कामे दिसतातही; पण लोक अद्याप समाधानी नाहीत, हेही नक्की. शहराला मंत्रिपद मिळणार म्हणून आवई उठवण्यात आली. प्रत्यक्षात महामंडळसुद्धा वाट्याला येते की नाही, अशी शंका येते. थोडक्‍यात, फार काही चांगले नाही आणि फार काही वाईटही नाही. वेळ गेलेली नाही, भरपूर संधी आहे. आमदारांची कामाची धावपळ दिसते. चर्चा, गाठीभेटी, बैठकाही दिसतात. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीने आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलेल, अशी अद्याप आशा आहे. शहराचा विकास, ही विकास शब्दाची थट्टा होऊ नये इतकेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com