जुन्या हद्दीचा सुधारित डीपी

दीपेश सुराणा
शुक्रवार, 7 जुलै 2017

महापालिकेचा निर्णय; पुढील वीस वर्षांचे नियोजन
पिंपरी - महापालिकेचा जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. आगामी 20 वर्षांतील संभाव्य लोकसंख्या वाढ लक्षात घेता नव्या सुविधांबाबत यात नियोजन केले जाईल.

महापालिकेचा निर्णय; पुढील वीस वर्षांचे नियोजन
पिंपरी - महापालिकेचा जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. आगामी 20 वर्षांतील संभाव्य लोकसंख्या वाढ लक्षात घेता नव्या सुविधांबाबत यात नियोजन केले जाईल.

आराखड्यातील जागावापराचे सर्वेक्षण करून त्याचा नकाशा व अहवाल तयार करण्याचे काम खासगी संस्थेला सोपविले जाणार आहे.

महापालिका हद्दीतील क्षेत्र 177 चौरस किलोमीटर इतके आहे. जुन्या हद्दीचा विकास आराखडा 1995 ला मंजूर झाला. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या एकत्रित 86 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी हा आराखडा तयार केला होता. एमआयडीसी हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे हा विकास आराखडा सुधारित करताना त्यातून एमआयडीसीचे 12.52 चौरस किलोमीटर क्षेत्र वगळले जाणार आहे. त्याशिवाय महापालिका आणि प्राधिकरण यांचे दोन स्वतंत्र विकास आराखडे तयार केले जातील. जुन्या हद्दीचा 54.78 चौरस किलोमीटर क्षेत्राचा सुधारित आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी सध्या शहरातील जागावापराचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम खासगी संस्थेला दिले जाणार आहे. या कामासाठी 21 जुलैपर्यंत निविदा मागविल्या आहेत. पात्र संस्थेकडून सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

प्राधिकरणाचा 18.70 चौरस किलोमीटर क्षेत्राचा स्वतंत्र सुधारित विकास आराखडा तयार केला जाईल. दोन्ही आराखड्यासाठी जागावापराचे सर्वेक्षण करण्याचे काम एकाच संस्थेला देण्याचे नियोजन आहे.

सुधारित विकास आराखड्याच्या कामासाठी प्रथम निविदा प्रक्रियेद्वारे जागावापराचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी निश्‍चित केली जाईल. पुढील सहा महिन्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर आरक्षण निश्‍चिती व अन्य कामे सुरू होतील.
- प्रकाश ठाकूर, उपसंचालक, नगररचना व विकास विभाग.

Web Title: pimpri pune news Improved DP of Old area