निगडीत मेट्रोचे मल्टिमोडल हब - डॉ. ब्रिजेश दीक्षित

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 29 मार्च 2018

पिंपरी - ‘निगडीपर्यंत मेट्रो नेल्यास तिथे मल्टिमोडल हब होईल,’’ असा विश्‍वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्प पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्याचा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा मोठा दबाव आहे. त्यासाठी निगडीपर्यंतचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी - ‘निगडीपर्यंत मेट्रो नेल्यास तिथे मल्टिमोडल हब होईल,’’ असा विश्‍वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्प पिंपरीपासून निगडीपर्यंत वाढविण्याचा पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा मोठा दबाव आहे. त्यासाठी निगडीपर्यंतचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी मंगळवारी नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. त्या वेळी नागपूरमधील मेट्रो भवनमध्ये डॉ. दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘नागपूरमधील मोठ्या मार्गावर वर्षअखेर मेट्रो धावेल. पुढील वर्षअखेरीपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल.

नागपूरमध्ये प्रकल्प व्यवस्थापनाच्या आधारे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम करताना अनेक सुधारणा करण्यात आल्या. नवीन तांत्रिक बदलाचा समावेश केल्याने पुण्यातील प्रकल्पाला फायदा झाला. नागपूरला साडेतीन आणि साडेचार किलोमीटर लांबीचे दोन उड्डाण पूल मेट्रोसोबत तयार होत आहेत. उड्डाण पुलाचा खर्च महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहेत. पुणे महापालिकेने नळस्टॉप येथे सहाशे मीटर लांबीचा उड्डाण पूल मेट्रो प्रकल्पासोबत करण्यास सांगितले आहे.’’

‘‘निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासंदर्भात सुरवातीपासूनच मोठी मागणी आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचा आराखडा तयार झाल्यानंतर त्याचा निधी उभारण्याचा मुद्दा येईल. त्या आराखड्याला राज्य सरकारची, तसेच केंद्र सरकारची मान्यता लागेल. पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही मदतीची तयारी दर्शविली आहे. निगडी बस स्थानकाच्या ठिकाणी मोठा हब उभा करता येईल. नागपूरला अशा पद्धतीने प्रकल्प उभा करून त्यातून निधी उभारण्यात येत आहे,’’ असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

असे असेल मल्टिमोडल हब
मल्टिमोडल हबमध्ये मेट्रो, बीआरटी, रिक्षा, एसटी बस या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा समावेश राहणार आहे. तेथे वाहनतळही असेल. वरील मजल्यांवर व्यापारी केंद्र असेल. त्यातून मिळणारे उत्पन्न मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वापरता येईल. नागपूरला या पद्धतीने दोन भव्य प्रकल्प उभारण्यात येत आहेत. पुण्यातही धान्यगोदाम, स्वारगेट येथे अशा प्रकल्पाचे महामेट्रोचे नियोजन आहे. 

खडकीबाबत अंतिम टप्प्यात चर्चा 
संरक्षण दलाच्या वरिष्ठ पातळीवर खडकी कॅंटोन्मेंट येथील जागा मिळविण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात ती जागा मिळेल आणि तेथील काम सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. पिंपरी चौक किंवा खराळवाडी येथे मेट्रो स्थानक उभारण्याबाबत विचारणा केली असता, ‘त्यासंदर्भात कोणी मागणी केलेली नाही, पण त्या संदर्भात जागा पाहणी करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले.

डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले...
बालगंधर्व रंगमंदिराबाहेरील वाहनतळाची जागा महामेट्रोने मागितली आहे, तिथे वाहनतळ उभारण्यात येईल 

बालगंधर्व रंगमंदिराची जागा मागितलेली नाही, या नाट्यगृहामुळे तेथील मेट्रो स्थानक आम्ही ‘म्युझिकल स्टेशन’ करणार आहोत. स्थानकाला मृदंगाचा आकार देणार आहोत, त्यालगत वीणेचा आकार दिला जाईल. 

स्वारगेट येथे एसटी बसस्थानकाची जागाही वापरण्यात येईल. तेथे प्रवाशांना ये-जा करण्याची सुविधा देऊ. स्वारगेटला मोठा प्रकल्प उभारण्यात येईल.

पुणे, नागपूर येथे वायुप्रदूषण खूप आहे. पुण्यात अरुंद रस्ते, वाहनांची गर्दी आहे. पदपथावर अनेक अतिक्रमणे आहेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम हवी. चांगले पदपथ हवेत.

सातारा रस्त्यावर उड्डाण पूल जास्त आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्प रस्त्यावरून करताना अडचणी आहेत. कात्रजसाठी प्रकल्प आराखडा करीत आहोत. दुसऱ्या टप्प्यात कात्रजपासून हडपसरकडे मेट्रो नेण्याचा विचार आहे.

दृष्टिक्षेपात नागपूर मेट्रो
लांबी : ३८ किलोमीटर
काम पूर्ण : ६० टक्के
एकूण स्थानके : ३७
अंतिम टप्प्यात तीन स्थानके
चाचणी पूर्ण जमिनीवरील स्थानकांवर
सुरक्षा विभाग आयुक्तांमार्फत तपासणी १० दिवसांत
पहिली मेट्रो ५.५ किलोमीटर धावण्यासाठी सज्ज

Web Title: pimpri pune news metro multimodel hub