पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो - श्रीरंग बारणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पिंपरी - पुणे महामेट्रोच्या 31 किलोमीटर मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर 2016 रोजी मान्यता दिली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावा, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. पत्राची प्रत खासदार श्रीरंग बारणे यांनाही पाठविली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात खासदार बारणे यांनी केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली होती. पुरी यांनी महापालिका सर्वाधिक आर्थिक सहभाग उचलण्यास तयार असेल, तर पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे म्हटले होते. मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. याबाबत राज्य सरकारने उचित कारवाई करावी, असे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठविले असून, मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे.

बारणे म्हणाले, की 'केंद्र सरकारच्या वतीने पुणे महानगर क्षेत्रातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र. 1 स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरू व्हावी, ही पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत मी केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांना पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची विनंती केली होती.''

मुख्यमंत्र्यांना भेटणार
आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली असल्याचे सांगून बारणे म्हणाले, 'पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता. तसेच, नागरिकांच्या मागणीचा विचार करून पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या मार्गास राज्य सरकारने त्वरित मान्यता द्यावी. राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत करून महामेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर त्वरित तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.''

ते म्हणाले, 'मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची शहरवासीयांची मागणी आहे. त्याला केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली आहे. पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता द्यावी. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत आर्थिक सहकार्य करावे. काही आर्थिक भार पिंपरी- चिंचवड पालिका पेलेल, त्यामुळे पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चालू कामात निगडीपर्यंतचे देखील काम मार्गी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.''

Web Title: pimpri pune news metro to nigdi in first step