जलपर्णी काढण्यासाठी आधुनिक मशिन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

महापालिकांसाठी उपयुक्‍त
जलपर्णी काढणारी अत्याधुनिक यंत्रणा ही महापालिकांसाठी उपयुक्‍त ठरणारी आहे. सध्या बहुतेक महापालिका नदीतील जलपर्णी काढण्याचे काम हे कंत्राटदाराला देतात. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत प्रदीप तुपे यांनी व्यक्‍त केले.

पिंपरी - नदीपात्रात फोफावलेली जलपर्णी काढण्याचे काम महापालिका प्रशासनासाठी दरवर्षी एक मोठे आव्हान असते. आता मात्र, ते संपुष्टात येणार आहे. जलपर्णी काढून जागेवरच विल्हेवाट लावणारे संपूर्ण देशी बनावटीचे मशिन पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक प्रदीप तुपे यांनी तयार केले आहे. 

संपूर्ण हायस्पीड तंत्रज्ञान असणारे हे मशिन दोन महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. सुरवातीला पाषाण तलावातील जलपर्णी मशिनद्वारे काढण्यात येईल. त्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नद्यांमधील जलपर्णी काढली जाणार आहे, अशी माहिती तुपे यांनी ‘सकाळ’ला दिली.

नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले गेले की त्या ठिकाणी जलपर्णी तयार होते. जलपर्णी नीट काढली नाही, तर पुन्हा उगवते. त्याचे बीज हे २० वर्षांपर्यंत जिवंत राहते. सध्या जलपर्णी दोरीने ओढून काढली जाते आणि त्यानंतर ती नदीकाठावर ठेवली जाते. पावसाळ्यात पाणी आले की ती पात्रात मिसळली जाते आणि पुन्हा तिथे जलपर्णी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

जलपर्णी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशिन तयार केले आहे. हे मशिन पूर्णपणे पाण्यात जाते, त्यानंतर मशिनला असणाऱ्या कन्व्हेअर बेल्टच्या साह्याने जलपर्णी मुळासकट काढली जाते. त्यानंतर पाणी काढून जलपर्णीचे वजन कमी करण्यात येते. अखेरीस ही जलपर्णी जाळून त्यांची राख करण्यात येते, असे तुपे यांनी सांगितले.
मशिनरीची किंमत २० लाखांपर्यंत आहे. सुरवातीला पाच ते सहा मशिन तयार करण्यात येणार आहेत. प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहून त्याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे.

Web Title: pimpri pune news Modern machine to remove the waterfowl