योजनांच्या लाभासाठी पालिकेकडे विक्रमी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

अनेक नागरिकांना 
सरकारी योजनांची माहिती नसते; परंतु महापालिकेने सातत्याने जनजागृती केल्याने योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यात नागरवस्ती विभागाला यश येत असल्याचे नागरिकांकडून यंदा मिळालेला प्रतिसादावरून स्पष्ट होते.
- संभाजी ऐवले, समाज विकास अधिकारी, नागरवस्ती विभाग

पिंपरी - केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे यंदा इच्छुकांचे विक्रमी ३९ हजार ८२५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी व तपासणी नागरवस्ती विभागाने हाती घेतली असून, ते काम पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या महिला बालकल्याण योजना, मागासवर्गीय, अपंग आणि अन्य कल्याणकारी योजनांसाठी अर्ज आले आहेत. गत वर्षी २०१६-१७ १४ हजार अर्ज आले होते. या वेळी जवळपास अडीचपटीने जादा अर्ज दाखल झाले आहेत. नागरवस्ती विभागामार्फत काही योजना ठराविक कालावधीसाठी; तर काही वर्षभर राबविल्या जातात. एक एप्रिल २०१७ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत शहरातील ४४ नागरी सुविधा केंद्रांमार्फत महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग आणि इतर अशा चार प्रमुख कल्याणकारी योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आणि विभागाकडे ३९ हजार ८२५ अर्ज आल्याचे समाजविकास अधिकारी तथा माहिती अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितले.

विभागामार्फत आलेल्या अर्जांची छाननी करून प्राधान्यक्रम निश्‍चित केला जाणार आहे. त्यासाठी दररोज कार्यालयीन वेळेत तपासणीचे काम सुरू आहे. 

समूह संघटक, समाजसेवक, सहायक समाज विकास अधिकारी आणि समाज विकास अधिकारी अशा चार टप्प्यांद्वारे अर्जांची छाननी सुरू राहील. प्राधान्य यादी जाहीर केली जाणार असल्याचे ऐवले यांनी सांगितले. अर्जात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित अर्जदाराला पत्र पाठवून दुरुस्तीची किंवा अर्ज पूर्ण करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थी उमेदवाराला संबंधित योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

योजनेनुसार प्राप्त अर्ज
योजना                                 अर्ज

महिला व बालकल्याण -         २५,३२९
मागासवर्गीय कल्याणकारी -     ७,२९९
अपंग कल्याणकारी -                १,३४८
इतर कल्याणकारी -                ५,५३९
एकूण अर्ज -                          ३९,८२५

Web Title: pimpri pune news more forms collect for municipal scheme