राष्ट्रवादीचा शनिवारी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पिंपरी - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (ता. ७) महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मोर्चात सहभागी होणार असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाची तयारी करण्यासाठी प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मोर्चाचे निमित्त साधत पक्षसंघटना सक्रिय करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या तयारीला लागण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पक्षातील नेत्यांना दिला. त्यामुळे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता पिंपरी-चिंचवडमध्येही संघर्षाची भूमिका घेईल, अशी चिन्हे आहेत.

पक्षाने एक ऑक्‍टोबरपासून सात ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी महागाईविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपरीत मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीची, तसेच नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन मोर्चाची तयारी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पक्षाच्या प्रभागस्तरीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, तसेच माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

वाघेरे म्हणाले, ‘‘सर्वच वस्तूंचे भाव वाढले असून, महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले. जीएसटीमुळे लोकांवरील आर्थिक बोजा वाढला, तर या कराच्या अंमलबजावणीमुळे व्यापारीवर्गही त्रस्त झाला आहे. कामगारवर्गावरही मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून, कामगार कायद्यात बदल केले जात आहेत. त्यांचे वेतन वाढत नाही. पिंपरी-चिंचवड परिसरात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने, त्यांच्या व्यथा या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही मांडणार आहोत.’’

‘‘स्थानिक प्रश्‍नांमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय, शास्तीकर, रिंगरोड, रेडझोन यांच्याबाबत विचारणा केली जाईल. विजेचे भारनियमन वाढले आहे. पाणीटंचाईची समस्या वाढली. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना, पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी अनेक योजना आखल्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या नागरी प्रश्‍नांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. हे प्रश्‍नही या मोर्चाच्या वेळी मांडण्यात येतील,’’ असे वाघेरे यांनी सांगितले.

पंचपीर चौकातून मोर्चाचा प्रारंभ
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मोर्चाचा प्रारंभ काळेवाडीतील पंचपीर चौकातून शनिवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता होईल. पिंपरी कॅम्प, डिलक्‍स चौक, पिंपरी बाजारपेठ, भाटनगरमार्गे आंबेडकर चौकात मोर्चा येईल. तिथे समारोप होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली. 

Web Title: pimpri pune news ncp rally