पर्यटनासोबत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’चा संदेश

सागर शिंगटे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पिंपरी - पुणे-लडाख, नेपाळ-भूतान, सिक्कीम आणि ईशान्येकडील सात राज्यांतील पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच ‘एमएच-१४ रॉयल बुल्स’ मोटारसायकल क्‍लबने वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या पालनास प्रोत्साहन देत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’, वृक्षारोपण, कारगिल शहिदांना मानवंदना देत सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे. 

पिंपरी - पुणे-लडाख, नेपाळ-भूतान, सिक्कीम आणि ईशान्येकडील सात राज्यांतील पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच ‘एमएच-१४ रॉयल बुल्स’ मोटारसायकल क्‍लबने वाहतूक नियम आणि सुरक्षेच्या पालनास प्रोत्साहन देत ‘नो ड्रिंक ॲण्ड ड्राइव्ह’, वृक्षारोपण, कारगिल शहिदांना मानवंदना देत सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे. 

‘रॉयल एन्फिल्ड’(बुलेट)प्रेमी राहुल वाडकर आणि योगेश हळदीपूर यांनी २०१३ मध्ये ‘एमएच-१४ रॉयल बुल्स’ मोटारसायकल क्‍लबची स्थापना केली. या क्‍लबला दिलीप सिंग भाटी, विनीत एकबोटे, राजेंद्र प्रसाद, शैलेंद्र ताडे, सागर हिंगमिरे, अमित जाधव, संजय मोझर आदी सुमारे ४० हून अधिक सक्रिय सदस्य जोडले गेले आहेत. तत्पूर्वी वाडकर आणि हळदीपूर यांनी २०१० मध्ये ‘पुणे-लडाख-पुणे’ असा १८ दिवसांत मोटारसायकलवरून सहा हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केला. त्यावेळेस आलेले अनुभव लक्षात घेत पर्यटनासाठी भ्रमंती करणाऱ्या मोटारसायकलप्रेमींना संभाव्य अडचणींना तोंड द्यावे लागू नये, या हेतूने त्यांनी या क्‍लबची स्थापना केली. 

वाडकर म्हणाले, ‘‘आमच्या क्‍लबच्या सदस्यांनी २०१५ मध्ये नेपाळ-भूतान-सिक्कीम येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी सात राज्यांतील सात हजार ५०० किलोमीटरचा प्रवास २० दिवसांत पूर्ण केला.’’

सामाजिक कार्यातही क्‍लबचे सदस्य हिरिरीने पुढाकार घेत असल्याचे सांगून वाडकर म्हणाले, ‘‘हेरिटेज राईडअंतर्गत भिगवणजवळील १४ व्या शतकातील पळसदेव या महादेवाच्या पुरातन मंदिराला भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथील गाळ काढला. वाहतूक नियम आणि चालकांच्या रस्ता सुरक्षेबद्दलही जागृतीही केली जाते. रक्तदान शिबिर, अंबा घाटात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांतही सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.’’

डिसेंबरला विवेकानंद स्मारकाला भेट
क्‍लबचे काही सदस्य डिसेंबरमध्ये दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणार आहेत. काही सदस्य नेपाळ येथे जाणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गोवा रायडर मेनिया या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही सदस्य सहभागी होत आहेत.

Web Title: pimpri pune news no drink & drive message