मीडिया सेलसाठीच्या उधळपट्टीस विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहराची प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेसाठी नागपूरच्या धर्तीवर खासगी तत्त्वावर सोशल मीडिया कक्ष स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी तीन वर्षांकरिता सुमारे ७५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याला माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला आहे. 

पिंपरी - शहराची प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेसाठी नागपूरच्या धर्तीवर खासगी तत्त्वावर सोशल मीडिया कक्ष स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी तीन वर्षांकरिता सुमारे ७५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्याला माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला आहे. 

करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी न करता सध्या सुरू असलेला जनसंपर्क विभागच अधिक सक्षम करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. सोशल मीडिया कक्षाच्या कामासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या आहेत. संबंधित एजन्सीमार्फत महापालिकेच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रसिद्धी केली जाईल. टीव्ही, रेडिओसाठी माहितीपट, लघुपट निर्मिती केली जाईल. वृत्तपत्रातील जाहिरातींची संकल्पना, निर्मिती, आर्टवर्क तयार करणे आदी कामे त्यामध्ये प्रस्तावित आहेत. त्याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिका प्रकल्पांची व अन्य कार्यक्रमांची माहिती प्रसिद्ध करण्याचे कामदेखील संबंधित एजन्सीकडे असणार आहे.

भापकर यांनी संबंधित सोशल मीडिया कक्षाला विरोध दर्शविला आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरातील करदात्या नागरिकांचे पैसे वाचविण्यासाठी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी शासकीय वाहने, भत्ते नाकारतात. दरवर्षी काढण्यात येणारी रोजनिशी (डायरी) अद्यापपर्यंत काढलेली नाही. दुसरीकडे अशाप्रकारे सोशल मीडिया कक्ष स्थापन करून तीन वर्षांसाठी ७५ लाख रुपयांची उधळपट्टी होणार आहे. हा विषय मागे घेऊन जनतेचे आर्थिक नुकसान थांबवावे.

महापालिकेचे प्रकल्प आणि विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी संबंधित खासगी मीडिया सेलचा उपयोग होणार आहे. नागपूरच्या धर्तीवर ही योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते.

Web Title: pimpri pune news oppose to media sale expenditure