‘पवना’तून शहराला जादा पाणी

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 30 मार्च 2018

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.

पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २९) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्ता भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, विजय काळे, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर हे आमदार, तसेच खासदार अनिल शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागातील विस्कळित पाणीपुरवठा, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची आवश्‍यकता या संदर्भात हर्डीकर यांनी बैठकीत मुद्देसूद मांडणी केली. त्यामुळे शहरवासीयांना पुरेसे आणि मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी देण्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. पुण्यातील विश्रामगृहात या बैठकीनंतर हर्डीकर यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली. 

शहरात ज्या भागात पाणीपुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत, तेथील समस्या त्या जागी पाहणी करून सोडविण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. २४ बाय ७ योजनेचे कामही गतीने सुरू झाल्यास, जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीला आळा बसेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

आयुक्त म्हणाले
प्रतिव्यक्ती दररोज १३५ लिटर पाणी देण्याऐवजी ते १७० लिटर दिले पाहिजे, हा मुद्दा मांडला. त्यांनी १५५ लिटर देण्याची तयारी दर्शविली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड ही शहरे जुळी असून, त्यामुळे या महापालिकांना ‘अ’ दर्जाच्या महापालिका गृहीत धरून पाणी दिले पाहिजे. पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाळ्यात ग्रामीण भागातून लोक मोठ्या संख्येने येतात. त्यांची, तसेच शहरवासीयांची पाण्याची मागणी वाढते. जलसंपदा विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी महापालिकेतर्फे पुन्हा नदीत सोडणार आहे. त्या प्रमाणात जादा पाणी देण्याचेही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आले.

भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या सचिव पातळीवर बैठक घेण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कोणताही विचार सध्या नाही. मे महिन्यातही अडचण येणार नाही, असे सध्या वाटते. महापालिकेच्या पाणी वितरणामध्ये त्या वेळी अडचण आल्यास, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत्या पावसाळ्यापर्यंत कोणतीही अडचण नाही. भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नातून मार्ग काढू. त्यासाठी वेगळी बैठक घेणार आहोत. चासकमान धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या गळतीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही महापालिकांनी शहरांतर्गत जलवाहिनीतून होणारी गळती रोखण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
- गिरीश बापट, पालकमंत्री

पिंपरी चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून सोडलेले पाणी देहू बंधारा येथे घेता येईल. त्यासंदर्भात लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा वाढेल. महापालिकेने पवना नदीत दोन बंधारे बांधून देण्याचे मान्य केले आहे. रावेत बंधाऱ्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.
- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री

Web Title: pimpri pune news pawana dam water