पवना धरणाची साठवणूक वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पिंपरी - ‘‘पवना धरण क्षेत्रातील ७६ हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणाची साठवणूक क्षमता १७ दशलक्ष घनफूटने वाढली आहे. पर्यायाने, धरण क्षेत्रात ७ कोटी लिटर इतका जादा पाणीसाठा साठविणे शक्‍य होत आहे’’, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उप-अभियंता मनोहर खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पिंपरी - ‘‘पवना धरण क्षेत्रातील ७६ हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणाची साठवणूक क्षमता १७ दशलक्ष घनफूटने वाढली आहे. पर्यायाने, धरण क्षेत्रात ७ कोटी लिटर इतका जादा पाणीसाठा साठविणे शक्‍य होत आहे’’, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उप-अभियंता मनोहर खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पवना धरणाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान खाडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. महापौर नितीन काळजे, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते. खाडे म्हणाले, ‘‘पवना धरण क्षेत्रात १५ जूनपर्यंत केवळ २० टक्के इतका पाणीसाठा होता. सध्या ९८.४५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेल इतका आहे. धरण क्षेत्रात सध्या ८.१७ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.’’ 

पवना धरण मजबुतीकरणाचे काम २००४ मध्ये पाटबंधारे विभागाने हाती घेतले. मात्र, २००८ पासून हे काम बंद असल्याची माहिती खाडे यांनी दिली. काम बंद ठेवण्याच्या कारणाबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘थेट जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलनापासून हे काम बंद ठेवले आहे.’’ 

पवना धरण मजबुतीकरणासाठी महापालिका निधी उपलब्ध करून देणार का, याबाबत महापौर काळजे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘पवना धरणाचे मजबुतीकरण करताना धरणाची उंची वाढवीत आहेत का, असा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी मावळातील स्थानिक शेतकऱ्यांशी प्रथम चर्चा केली जाईल. त्यानंतरच धरण मजबुतीकरणासाठी निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.’’

तासाला दहा मेगावॉट वीजनिर्मिती
‘‘पवना धरणाजवळ असलेल्या पवना जल विद्युत केंद्रात दर तासाला सरासरी १० मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. येथे निर्माण होणारी वीज चिंचवड, लोणावळा येथील सबस्टेशनला जोडली आहे. वीजनिर्मितीसाठी धरण क्षेत्रातून १२०० क्‍युसेक इतके पाणी सोडले जात आहे,’’ अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जॉन बर्वे यांनी दिली.

Web Title: pimpri pune news Pawana dam's storage increased