पाण्याचे राजकारण तापले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

राष्ट्रवादी करणार आंदोलन

पिंपरी - महापालिकेने येत्या दोन दिवसांत नागरिकांना रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कोणतेही ठोस कारण नसताना एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राष्ट्रवादी करणार आंदोलन

पिंपरी - महापालिकेने येत्या दोन दिवसांत नागरिकांना रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कोणतेही ठोस कारण नसताना एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वाघेरे म्हणाले, ‘‘पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. सध्याचेच पाणी नेहमीप्रमाणे लोकांना रोज दिले तरी ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळू शकते. पाणीकपातीबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कोणतीही सूचना केली नव्हती. यंदा वेळेवर पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. 

पाऊस आल्यानंतर धरणातील पाणीसाठा वाढणारच आहे. अशी अनुकूल परिस्थिती असताना पाणीकपात सुरू ठेवण्याचे काहीच कारण नाही.’’
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिका आयुक्तांना मंगळवारी या संदर्भात निवेदन देण्यात येईल. नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत देऊ. तरीही पाणीकपात रद्द न केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करील. त्याची पूर्ण जबाबदारी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची राहील. कोणतेही योग्य कारण नसताना नागरिकांना वेठीस धरले जात आहे. ते आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेनेही दंड थोपटले

अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत असून, पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा येत्या आठवड्यात सुरळीत सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक राहुल कलाटे आणि माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी  दिला.
कलाटे म्हणाले, ‘‘एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर, त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना त्या संदर्भातील निवेदन दिले होते. त्याबाबत दोन दिवसांत आढावा घेण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले होते. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विरोधी पक्षाला विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत. महापालिका प्रशासनानेही आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल वाढत असून, त्यांच्यासाठी शिवसेना आंदोलन करेल.’’
उबाळे म्हणाल्या, ‘‘टॅंकरद्वारे पाणी घेण्याशिवाय नागरिकांना पर्याय उरलेला नाही. टॅंकरचालक मोठी रक्कम नागरिकांकडून घेतात. महापौरांसह अनेक नगरसेवकांचे टॅंकर आहेत. टॅंकरच्या अनेक फेऱ्या होत असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांकडून रक्कम घेतली जाते. धरणात पुरेसा साठा असल्यामुळे महापालिकेने तातडीने रोज पाणीपुरवठा सुरू करावा, अशी शिवसेनेची मागणी आहे.’’

Web Title: pimpri pune news politics on water