दमदार आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मॉन्सूनचे सोमवारी दुपारी पिंपरी-चिंचवड परिसरात दमदार आगमन झाले. ढगांनी आकाशात गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाल्याने शहरवासीयांनी सुखद गारवा अनुभवला. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर दिवसभर रिपरिप सुरू होती. आजच्या पहिल्याच पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र होते. 

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मॉन्सूनचे सोमवारी दुपारी पिंपरी-चिंचवड परिसरात दमदार आगमन झाले. ढगांनी आकाशात गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाल्याने शहरवासीयांनी सुखद गारवा अनुभवला. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर दिवसभर रिपरिप सुरू होती. आजच्या पहिल्याच पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र होते. 
पिंपरी, चिंचवड, भोसरी, दिघी, निगडी, आकुर्डी, काळेवाडी, रहाटणी, वाकड, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख असा सगळा परिसर पावसाने न्हाऊन निघाला. काही ठिकाणी बच्चे कंपनीने मॉन्सूनच्या पहिल्या पावसात भिजण्यात आनंद लुटला. तासभर पडलेल्या पावसाच्या सरीमुळे चौक-चौकात वाहतूक कोंडी झाली होती. पावसापासून वाचण्यासाठी वाहनचालक झाडांच्या आडोशाला थांबले होते. रस्त्यावरील फळ व भाजीविक्रेते आणि पायी जाणाऱ्या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे त्रेधा उडाली.

झाडे उन्मळून पडली
प्राधिकरण, सेक्‍टर २२, एमआयडीसी, चिंचवडगावातील मोरया ब्लड बॅंक रस्त्यावरील, मोरवाडी आणि मोहननगर या परिसरातील झाडे सुसाट वाऱ्यामुळे उन्मळून पडली. सेक्‍टर २३ मध्ये रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यावर नागरिकांनी उद्यान विभाग 

आणि अग्निशामक विभागाकडे तक्रारी केल्या. पडलेली झाडे, फांद्या बाजूला केल्याचे उद्यान विभागप्रमुख सुरेश साळुंके यांनी सांगितले. 

सखल भागांत पाणी 
निगडी, आकुर्डी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, अजमेरा कॉलनी, नेहरूनगर परिसरातील सखल भागात पाणी शिरले. भोसरीत रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचले होते. काळभोरनगर येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. गटारांतील पाणी रस्त्यावर साठल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत होती. सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाने जोर धरला होता. 

नाला गायब झाल्याने थेरगावातील घरांत पाणी

थेरगाव येथील धनगरबाबा मंदिर परिसराला सोमवारी (ता. १२) तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक, गाळ, कुजलेल्या पालेभाज्या, ड्रेनेजचे पाणी वाहून आले. ते परिसरातील दुकाने व घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. ही परिस्थिती गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात निर्माण होत असून, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

नैसर्गिक नाला गायब
उतारावरील परिसरातून काही वर्षांपूर्वी जाणारा नैसर्गिक नाला पवना नदीला जाऊन मिळायचा. मात्र, झपाट्याने वाढलेले नागरीकरण व अतिक्रमणांमुळे हा नाला नामशेष झाला आहे. आता हा नाला धनगरबाबा मंदिरासमोर रहाटणी हद्दीतून एक मोकळी जागा व एका सोसायटीदरम्यान सुरू होत असून, तोही सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. काही बिल्डरांनी नाल्यावर बांधकाम करून तो बंदिस्त केला आहे. त्यामुळे थेरगावातील उंचावरील भागातील पावसाचे पाणी वाहून येऊन या भागात साचते.

महापालिकेने पावसाचे पाणी नदीत वाहून नेण्यासाठी शहराच्या विविध भागात सांडपाणी वाहिन्या (स्ट्रॉम वॉटर लाइन) टाकल्या आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वी त्या साफ करणे अपेक्षित होते. 

महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असून, काही स्ट्रॉम वॉटर वाहिन्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप नागरिकांनी केला.  

रहाटणी भागातून सुरू होणाऱ्या नैसर्गिक नाल्यातील पाणी पवना नदीत जाण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. अरुंद असलेला नाला अतिक्रमणे काढून रुंद केला पाहिजे. त्यामुळेच धनगरबाबा मंदिराजवळ पाणी साचते.
- अर्चना बारणे, नगरसेविका 

Web Title: pimpri pune news rain in pimpri