अमर साबळे यांच्याविषयी संताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

आंबेडकरवादी संघटनांकडून आंदोलनाद्वारे निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी - राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आंबेडकरवादी संघटनांबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, एमआयएम व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने साबळे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात लढण्यासाठी दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी मदत करतात, असे वादग्रस्त विधान साबळे यांनी केले होते. त्यामुळे दलित बांधवांत संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी काही कार्यकर्त्यांनी भेळ चौक, निगडी येथील त्यांच्या नामफलकाला काळे फासले; तर काहींनी पिंपरीत आंदोलन केले. आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रवक्ते के. डी. वाघमारे, सनी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, युवक उपाध्यक्ष आयफाज कुरेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मानव कांबळे म्हणाले, ‘‘आंबेडकरवादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न साबळे यांनी केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी.

आंबेडकरवादी विचारांचे पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी साबळे नावाचे बियाणे भाजप व आरएसएसने पेरल आहे.’’ 

साबळे यांच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या. महासंघाच्या वतीने कर्नाटकमधील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्याच मारेकऱ्यांनी गौरी यांची हत्या केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान, दलित पॅंथरनेही अमर साबळे यांच्यावर टीका केली असून, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. विचारवंतांना ठार मारणारी ही नक्षलवादीच प्रवृत्ती आहे. त्यांच्याच मुशीत खासदार अमर साबळे वाढले आहेत. त्यांच्यासारखे दलाल हाताशी धरून बहुजन समाजाला बदनाम करीत विचारवंतांवर हल्ला करणे भ्याडपणाचे नाही काय असा सवालही पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Web Title: pimpri pune news Regrettably about Amar Sable