बेशिस्त वाहनचालकाच्या तक्रारीवरून पोलिसाची बदली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

पिंपरी - बेशिस्त वाहनचालकावर कारवाई केल्याने वाहनचालकाने पोलिस आयुक्तांकडे खोटी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत कर्तव्यदक्ष पोलिसाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

पिंपरी - बेशिस्त वाहनचालकावर कारवाई केल्याने वाहनचालकाने पोलिस आयुक्तांकडे खोटी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत कर्तव्यदक्ष पोलिसाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

विकास आवटे असे या वाहतूक पोलिसाचे नाव असून ते निगडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या अतिश भालसिंग या वाहनचालकावर कारवाई करत दोनशे रुपयांचे ई-चलन केले. मात्र भालसिंग याने पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना व्हॉट्‌सऍप करून आवटे यांनी त्याच्याकडून पावती व्यतिरिक्त शंभर रुपये रोख घेतले, अशी तक्रार केली. तसेच थरमॅक्‍स चौक येथे महिला पोलिस हवालदाराने भालसिंग याचा मित्र शेट्टी याच्या काळ्या काचेच्या वाहनावर कारवाई केली. त्यावेळी शेट्टी याने कारवाईच्या निषेधार्थ पन्नास ते साठ जण जमवले. त्यावेळी आवटे कारवाईच्या ठिकाणी गेल्याचे समजल्याने या पोलिसांना धडा शिकवायचा या उद्देशाने भालसिंग याने यमुनानगर पोलिस चौकीत आवटे यांनी धमकावल्याची खोटी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यावेळी आवटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच भालसिंग याने आयुक्तांकडेही धमकावल्याची तक्रार केली. त्यामुळे आवटे यांची कोणतीही शहानिशा न करत वाहतूक नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलिसांत अस्वस्थता पसरली असून त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 

बेशिस्त वाहनचालकाची गुन्हेगारी प्रार्श्‍वभूमी 
नारायण गव्हाणचे उपसरपंच (ता. पारनेर, जि. नगर) प्रकाश कांडेकर यांच्या (सीआर क्र. 82/2010) खून प्रकरणात भालसिंग याच्या सांगण्यावरून मयत कांडेकर यांच्या डोक्‍यातील गोळी गायब केल्याचे सिव्हिलमधील आरोपींनी कबूल केले होते. त्यावेळी त्याला अटक करून गोळी शोधण्यात आली होती. मात्र नंतर त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर निगडी पोलिस ठाण्यात (सीआर क्र. 36/2009) त्याच्यासह साथीदारांविरोधात मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सक्रिय 
पोलिसांबरोबर आर्थिक संबंध स्थापित करून तसेच पार्ट्यांमधून पोलिसांच्या संपर्कात राहून पोलिस व अधिकाऱ्यांचे अनेक कच्चे दुवे जाणून घ्यायचे. त्याचे पुरावे जमा करून त्यांनाच ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सध्या शहरात सक्रिय असल्याची धक्कादायक माहीत समोर आली आहे.

Web Title: pimpri pune news Replace Police on Unskilled Driving Complaint