‘सकाळ’च्या ‘रौप्यमहोत्सवानिमित्त ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्‍येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर, भगवतीताई सातारकर, चिन्‍मय महाराज सातारकर आणि वारकरी.
ज्‍येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर, भगवतीताई सातारकर, चिन्‍मय महाराज सातारकर आणि वारकरी.

पिंपरी - ‘प्रत्‍यक्ष हे ज्ञान उघडेचि आहे..’ या अभंगावर सुश्राव्य विवेचन.. साथीला टाळ-मृदंगाचा गजर... हरिनामाचा जयघोष अशा भक्तिरसात चिंब झालेले वातावरण पिंपरी-चिंचवडकर वैष्णवांनी शनिवारी (ता. २५) अनुभवले. ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या  जयघोषाने सभागृहाचा आसमंत दणाणून गेला. कीर्तनाच्या रंगात प्रत्येक जण रंगून गेला होता.

निमित्त होते ‘सकाळ’ पिंपरी विभागीय कार्यालयाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षानिमित्त आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कार्यक्रमाचे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी आपल्या रसाळ, वाणीतून प्रेक्षकांना सुखी जीवनाचा राजमार्ग दाखविला.

अभंगांचे दाखले देत  बाबामहाराजांनी मानवाचे आयुष्य,  ईश्‍वर, सत्य, प्रकाश आणि ज्ञानाचा सार आणि भक्‍तीची अनुभूती सांगितली. विनोदाची पखरण करत कौटुंबिक नातेसंबधांचे दाखले देत त्यांनी अत्यंत सहजसोप्या शब्दांत भाविकांना ईश्‍वरनामाचे महत्त्व सांगितले. 

बाबामहाराजांची कन्या भगवतीमहाराज सातारकर आणि नातू चिन्मयमहाराज सातारकर यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊलींची प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. 

‘ज्ञान प्रत्यक्ष हे देव हातानोहे’ या अभंगावर बोलताना बाबामहाराज म्हणाले, ‘‘अनेक भाविक मला विचारतात की, ‘‘तुम्हाला देव भेटला का?’’ पण, केवळ प्रश्‍नोत्तरातून परमेश्‍वराची प्रचिती येत नाही. ज्ञान डोक्‍यात असते; पण ते पाझरून हृदयात येते त्याला ईश्‍वर म्हणतात. ज्ञानाला पाझर फुटणे म्हणजे माऊली. ज्ञानेश्‍वर या केवळ एका शब्दात हे ज्ञान सामावले आहे. जे तुम्हाला मिळते त्याला तुम्ही ज्ञान म्हणता; तर माहिती वाचूनही जमा करता येऊ शकते. ज्ञानेश्‍वर किंवा तुकाराम विशिष्ट पद्धतीने ज्ञान देतात. ते अलौकिक अशा स्वरूपाचे आहे.’’ 

कीर्तन हे फिजिओथेरपी आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘सिनेमे झाली, नाटके झाली; पण आता माणसे कीर्तनाकडे वळू लागली, याचा मला विशेष आनंद आहे. संध्याकाळ येते आणि जाते. मात्र, आपण आयुष्यभर संधिकालात राहतो. आपल्या आयुष्यातील संध्याकाळ कधीच संपत नाही. ही संध्याकाळ संपविण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम आहे. हरिरूपी ‘सकाळ’ आपल्या जीवनात असणे गरजेचे आहे. ज्या वेळी आपल्यामध्ये सात्विक आशा निर्माण होते, त्या वेळी पांडुरंगाच्या चरणी नक्की जावे. भगवंताचे नामस्मरण कराल, तेव्हा तुम्हाला विठूरायाचे अभूतपूर्व दर्शन घडेल. भगवंताच्या नामस्मरणात सर्वसुख आहे. भगवंताचे नाम घेतल्याशिवाय तृप्तीची अवस्था पूर्ण होत नाही.’’ 

‘‘देह हा भगवंताच्या प्रगटीकरणाचे साधन आहे. परब्रह्माचे दर्शन घडायचे असेल, तर आपल्या देहातच ते घडेल. फक्त ते पाहण्याची दृष्टी असली पाहिजे. जे आपल्या हातात आहे, म्हणजे प्राप्य आहे, ते कसे मिळणार; तर जे आपल्याकडे नाही, तेच आपल्याला मिळू शकते,’’ असेही त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमानंतर बाबामहाराज सातारकर, चैतन्य महाराज सातारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा   ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, पिंपरी विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, वरिष्ठ बातमीदार मिलिंद वैद्य यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, तुळसीचे रोप आणि श्री विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सराफ यांनी केले.

थकलेला ताजातवाना होतो
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच बाबामहाराज यांनी ‘सकाळ’चे भरभरून कौतुक केले. ‘कीर्तन’ही अखंड ‘सकाळ’ असल्याचे ते म्हणाले. ‘‘थकलेला जीव कीर्तन ऐकल्यावर ‘सकाळ’सारखा ताजातवाना होतो, तशीच ‘सकाळ’ वृत्तपत्राचीदेखील हीच खासियत आहे. ‘सकाळ’च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा मी ८३ वर्षांचा साक्षीदार आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com