शॉप ऍक्‍टची ऑनलाईन नोंदणी ठप्प 

रवींद्र जगधने
रविवार, 21 जानेवारी 2018

पिंपरी - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यातील सुधारणेबाबत संकेतस्थळावर अपडेशन सुरू असल्याने राज्यभरातील दुकाने व आस्थापना नोंदणीचे कामकाज 22 डिसेंबरपासून ठप्प आहे. त्यामुळे व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. मात्र, कामकाज निश्‍चित कधी सुरू होणार, याबाबत माहिती नसल्याचे पुणे कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ यांनी "सकाळ'ला सांगितले. 

व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रथम ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड केली जातात. त्यानंतर संबंधित दुकान निरीक्षक खातरजमा करून डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्र (शॉप ऍक्‍ट) देतो. व्यवसायाच्या नावाने बॅंक खाते, जीएसटी नंबर, पॅन कार्ड, बॅंक कर्ज आदींसाठी शॉप ऍक्‍टची गरज असते. मात्र, महिनाभरापासून संकेतस्थळावर नोंदणीचे कामकाज बंद आहे. चिंचवड येथील मालधक्‍क्‍याजवळील गुलजार बिल्डिंगमध्ये एकमेव दुकाने निरीक्षक कार्यालय आहे. तेथे नागरिक चकरा मारत आहेत. राज्य सरकारकडून दुकाने 24 तास सुरू ठेवण्याबाबत कायद्यात दुरुस्तीचे काम, तसेच इतर सुधारणांबाबत नोंदणीचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवले आहे. 

24 तास आस्थापना उघड्या ठेवण्याबाबत तसेच एक ते नऊ कामगार असलेल्या दुकानाला शॉप ऍक्‍टची गरज नसणार आदी सुधारणा कायद्यात करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नोंदणीचे काम बंद आहे. ते कधी सुरू होईल हे सांगता येणार नाही. 
- बाळासाहेब वाघ, कामगार उपायुक्त, पुणे. 

संकेतस्थळावर नोंदणीचे काम बंद आहे. त्यामुळे वीस दिवसांपासून दुकाने निरीक्षक कार्यालयात नागरिक चकरा मारत आहेत. मात्र, कामकाज कधी सुरू होणार हे सांगितले जात नाही. शॉप ऍक्‍ट नसल्याने कामे रखडली आहेत. अनेकांना नवीन वर्षात व्यवसाय सुरू करावा, अशी अपेक्षा असते. मात्र, नोंदणी होत नसल्याने तो सुरू करता येत नाही. 
- अभित परब, व्यावसायिक

Web Title: pimpri pune news shop act online registration stop