पिंपरीत विद्यार्थ्याचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

पिंपरी - केवळ तीन हजार रुपयांसाठी सीएच्या विद्यार्थ्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास घडली. 

या प्रकरणी चार जणांविरोधात पुणे रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत शिवम मनोज मिश्रा (वय १९, रा. चाकण, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम हा सीए करत असून, त्याने आकुर्डीत शिकवणी लावली आहे. शिकवणीसाठी तो चाकणवरून बसने कासारवाडीला व त्यानंतर लोकलने आकुर्डीला येतो.

शिकवणीनंतर पुन्हा आकुर्डीवरून कासारवाडी लोकलने व नंतर बसने चाकण असा प्रवास करतो. शनिवारी तो नेहमीप्रमाणे शिकवणीचे वर्ग सुटल्यानंतर आकुर्डीतून कासारवाडीसाठी लोकलने जात होता. त्या वेळी लोकलमध्ये चार जणांनी त्याला मारहाण करून पिंपरी रेल्वे स्थानकावर खाली उतरवले.

त्याच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, असे सांगून तीन हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेले वडील पैसे घेऊन चाकणवरून पिंपरीच्या दिशेने निघाले. तोपर्यंत त्या चार जणांनी त्याचा मोबाईल काढून घेतला. तसेच त्याला पिंपरी रेल्वे स्थानकावरच तब्बल तासभर नजरकैदेत ठेवले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी रेल्वे स्थानकावर येऊन तीन हजार रुपये अपहरणकर्त्यांना दिले. मुलगा कुठे आहे, असे विचारले असता तो रेल्वे स्टेशनशेजारी असलेल्या नातेवाइकांकडे गेला असल्याचे सांगून चारही जण पसार झाले. त्यानंतर वडील नातेवाइकांकडे गेले असता शिवम तेथे होता. याबाबत त्यांनी पोलिसांकडे धाव घेत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, पिंपरी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

Web Title: pimpri pune news student kidnap