पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी चौकातील ‘सब वे’चे संकल्प चित्र.
पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी चौकातील ‘सब वे’चे संकल्प चित्र.

‘सब-वे’ ठरणार रहदारीचा ‘नीट-वे’

पिंपरी - महापालिकेने पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सेवा रस्त्याने वाहतूक वळवली असून, ती सुरळीतपणे सुरू आहे. येत्या दहा महिन्यांत म्हणजे सप्टेंबर २०१८ पर्यंत ‘सब-वे’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा होणार आहे.

भविष्यात लाभदायी
मेट्रोच्या खांब उभारणीचे काम दापोडीत सुरू आहे. तसेच, ग्रेड सेपरेटरवरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे. त्यानंतर महापालिकेने तेथे खोदाईचे काम सुरू केले. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू असल्याने वाहतुकीस खोळंबा कमी काळ होणार आहे. मेट्रो, ‘सब-वे’ आणि हॅरिस पुलाला समांतर पूल उभारणीचे कामही वेगात सुरू असल्याने २०१८ च्या अखेरीला या ठिकाणी विना सिग्नल वाहतूक सुरू ठेवणे शक्‍य होणार आहे.

दापोडीत सुसाट; बोपोडीत अडखळत
पिंपरी- चिंचवडमधून वाहनांचा प्रवास दहा लेनमधून होतो. मात्र, तेथून पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रवेश करताना हॅरीस पुलावरील चार लेनमधून जावे लागते. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला रोजच वाहनांच्या रांगा लागतात. बोपोडीपासून पुण्याकडे अडखळत प्रवास करावा लागतो. सध्या बोपोडी ते खडकी रेल्वे स्टेशनपर्यंत पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

‘हॅरिस’ला समांतर पूल
दापोडी- बोपोडीतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेने बोपोडी येथील पुलालगतची झोपडपट्टी लवकर स्थलांतरित केल्यास २०१८ अखेरपर्यंत नवीन पूल बांधून पूर्ण होतील.

‘सब-वे’ची गरज का?
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) लष्करी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सीएमई प्रवेशद्वारासमोर महामार्गावर वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. मात्र, कमी संख्येने वाहने रस्ता ओलांडत असताना पुणे-मुंबई रस्त्यावरील मोठ्या संख्येने असलेली वाहने तेथे थांबवावी लागतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोज सकाळी व सायंकाळी वाहनांच्या लांब रांगा लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी सीएमईमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र सब-वे करण्याची सूचना सीएमई प्रशासनाने केली होती. ती लक्षात घेऊन महापालिकेने सब-वे उभारण्याचा निर्णय घेतला.

प्रकल्पाची वाटचाल
एप्रिल २०१६ : प्रकल्पाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर

जानेवारी २०१७ : कंत्राटदाराला दिला कामाचा आदेश. मात्र, मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने महापालिकेने काम पुढे ढकलले होते. ते आता सुरू झाले

दृष्टिक्षेपात ‘सब-वे’
अपेक्षित खर्च    ७.८४ कोटी
कामाची मुदत    १० महिने
लांबी    २१ मीटर
रुंदी    १२ मीटर
उंची    ५.५ मीटर
पदपथ (दोन्ही बाजू)    १.८ मीटर
जोडरस्त्याची लांबी    ३४० मीटर

अवजड वाहनेही जाऊ शकतील
लष्कराची अवजड वाहनेही ‘सब-वे’तून जाऊ शकतील अशा पद्धतीने ‘सब-वे’चा आराखडा केलेला असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दापोडीजवळ सेवा रस्त्याने वाहतूक वळविल्याने ‘सब-वे’ उभारण्यासाठी मुख्य रस्त्याची खोदाई करणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे ‘सब-वे’चे काम लवकरच पूर्ण होऊ शकते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

विविध प्रकल्पांचे केंद्रस्थान दापोडी
पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रो प्रकल्पाचे खांब उभारणीचे काम सुरू
सीएमई प्रवेशद्वारासमोर ‘सब-वे’चे काम सुरू
हॅरिस पुलाला समांतर पूल उभारणीचे कामही वेगात

पुणे-मुंबई महामार्गावर उभारणी
दापोडी सीएमईसमोर काम सुरू
सप्टेंबर २०१८ पर्यंत काम पूर्ण
‘सिग्नल’ शिवाय वाहतूक
लष्कराच्या वाहनांचीही सोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com