‘सुपर स्पेशालिटी’चे ‘तीनतेरा’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे डॉक्‍टर मेटाकुटीला

पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाप्रमाणे शस्त्रक्रिया विभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशानासाच्या दुर्लक्षामुळे सुपर स्पेशालिटी असलेल्या या रुग्णालयाच्या कामकाजाचे तीनतेरा वाजले आहेत. डॉक्‍टरांची कमतरता, अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव यामुळे येथील डॉक्‍टर मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शस्त्रक्रियेसाठी सर्वसामान्य रुग्णांना कित्येक आठवडे ताटकळत राहावे लागते. दुसरीकडे वशिल्याच्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जाते. 

अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे डॉक्‍टर मेटाकुटीला

पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाप्रमाणे शस्त्रक्रिया विभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशानासाच्या दुर्लक्षामुळे सुपर स्पेशालिटी असलेल्या या रुग्णालयाच्या कामकाजाचे तीनतेरा वाजले आहेत. डॉक्‍टरांची कमतरता, अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव यामुळे येथील डॉक्‍टर मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे शस्त्रक्रियेसाठी सर्वसामान्य रुग्णांना कित्येक आठवडे ताटकळत राहावे लागते. दुसरीकडे वशिल्याच्या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया केली जाते. 

वायसीएम रुग्णालयात सर्जरी विभागात तीन युनिट असून, प्रत्येक युनिटमध्ये तीन निवासी, तीन बॉन्डेड आणि एक रजिस्ट्रार अशी डॉक्‍टरांची संख्या असणे आवश्‍यक आहे. मात्र, तिन्ही युनिट मिळून २१ डॉक्‍टरांपैकी केवळ तीनच डॉक्‍टर उपलब्ध आहेत. या विभागांत आणखी १८ डॉक्‍टरांची गरज आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात २५० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. दर आठवड्याला एका युनिटकडून दुर्बिणीद्वारे चार शस्त्रक्रिया होतात. आठवडाभरात ५० सामान्य शस्त्रक्रिया होतात. बाह्यरुग्ण विभागाचे काम झाल्यावर तातडीक विभागात येणाऱ्या रुग्णांवर दिवसभर उपचार करावे लागतात. वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांकडे लक्ष द्यावे लागते. याशिवाय रोटेशननुसार रविवारीही तातडीक विभागात काम करावे लागते.

एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या विविध तपासण्या करून घेणे, त्यांचे रिपोर्ट पाहणे, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे आणि शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणाची ड्रेसिंग करणे, आदी प्रकारची कामे असतात. ही सर्व कामे सध्या युनिटमधील एका डॉक्‍टरला किंवा युनिटप्रमुख असलेल्या मुख्य डॉक्‍टरला करावी लागतात. अशावेळी एखाद्या रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यास याबाबत थेट वरिष्ठांकडे तक्रार होऊन त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे या विभागात काम करण्यासाठी इच्छुकांची संख्या कमी असते. यामुळे कर्तव्यावर असलेल्या डॉक्‍टरांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येतो. नियमानुसार ॲडमिट होणाऱ्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. दुसरीकडे वशिल्याच्या रुग्णांवर लवकर शस्त्रक्रिया होते. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नवोदितांना प्रवेश नाही
एमबीबीएस झाल्यानंतर एक वर्ष डॉक्‍टरला शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात सेवा द्यावी लागते. या सेवेसाठी रुग्णालयात आलेल्या नवोदित डॉक्‍टरांना आणखी शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असते. त्यांना शस्त्रक्रिया पाहण्यासाठीही ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश दिला जात नाही. यामुळे येथील डॉक्‍टरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

स्वतंत्र सर्जिकल आयसीयू हवा
वायसीएम रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या शस्त्रक्रिया करून नाव मिळविले आहे. काही रुग्णांना गॅंगरिंग झाल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. अशा रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर इतर रुग्णांसोबत आयसीयू कक्षात ठेवता येत नाही. या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या विभागासाठी स्वतंत्र ‘सर्जिकल आयसीयू’ची आवश्‍यकता आहे. याशिवाय ‘लेझर सर्जिकल’ची सोय उपलब्ध झाल्यास शेकडो रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो.

Web Title: pimpri pune news super specility issue