तंत्रज्ञानाला अनुसरून बालशिक्षण हवे - डॉ. काकोडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पिंपरी - ‘‘भारतीय समाज- संस्कृती आणि भविष्याशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती निर्माण होणे आवश्‍यक असून, देशात मूलभूत ते तंत्रज्ञान विकासापर्यंत संशोधन झाले पाहिजे. बालशिक्षणही त्या बदलास अनुसरून हवे,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

पिंपरी - ‘‘भारतीय समाज- संस्कृती आणि भविष्याशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती निर्माण होणे आवश्‍यक असून, देशात मूलभूत ते तंत्रज्ञान विकासापर्यंत संशोधन झाले पाहिजे. बालशिक्षणही त्या बदलास अनुसरून हवे,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे सांगवी केंद्र आणि छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने नवी सांगवी येथे आयोजित केलेल्या २४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

काकोडकर म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा वेग आणि प्रभावाची गती वाढत आहे. जगही त्यानुरूप झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाचे फायदे की तोटे, चांगले किंवा वाईट यापेक्षा मुलांना चांगले वळण लावून समजतील अशा पद्धतीने त्याचे दुष्परिणाम सांगायला हवेत. आपल्या देशातील शिक्षणाचा पाया कुठेतरी पाश्‍चात्त्य देशातील शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे. आपल्याकडील संशोधनही बऱ्याचदा परदेशी संशोधनाशी संलग्न असते. त्याची जाण होणेही आवश्‍यक आहे. परंतु, आपल्याकडील संशोधन हे स्थानिक अडीअडचणी सोडण्याच्यादृष्टीने अनुरूप हवे. त्यासाठी पाश्‍चात्त्य आणि देशी संशोधनामध्ये भागीदारी झाली पाहिजे. भविष्यकाळात विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी विविध टप्पे झपाट्याने बदलणार आहेत. त्यामुळे, त्याच्याशी सुसंगत बदल शिक्षणरचनेत झाला पाहिजे.’’

विवेक सावंत म्हणाले, ‘‘एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला तरी मानवी बुद्धिमत्तेचे आजही आकलन करणे शक्‍य नाही, किंवा तिचा कृत्रिम आविष्कार निर्माण करता आला नाही. मानवी बुद्धिमत्ता आणि न मानवी बुद्धिमत्ता हे परस्परांचे स्पर्धक नसून पूरक आहेत. जटिल प्रश्‍न सोडविण्यात तंत्रज्ञानाची प्रमुख भूमिका दिसून येते. बालशिक्षणात तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्याची दिशा समजून घेतली पाहिजे. मग, तंत्रज्ञानामागील उद्देश आणि धोरणे यशस्वी होऊ शकतात.’’

शितोळे म्हणाले, ‘‘समाज आणि शहराला बालशिक्षण परिषदेचा फायदा होईल. केवळ मोबाईल, टॅब किंवा संगणक म्हणजे तंत्रज्ञान नव्हे. जगात तंत्रज्ञानाचे असंख्य आविष्कार विस्मयकारक आहेत. घरामधूनच मुलांना तंत्रज्ञानाची आवश्‍यक माहिती दिली पाहिजे. त्याचा योग्य वापर करणेही शिकविले पाहिजे.’’

बालशिक्षणाचा अंतर्भाव 
राज्य सरकारच्या शिक्षण खात्यात प्राथमिक शिक्षणापासून पुढील शिक्षणाचा अंतर्भाव होतो. महिला व बालकल्याण विभागात महिला-बालकांच्या आरोग्यावर लक्ष दिले जाते. ते गरजेचेही आहे. परंतु, या दोन्ही विभागांपैकी एकाही विभागात बालशिक्षणाचा समावेश झालेला नाही. त्याबद्दल अधिवेशनात खंत व्यक्त करण्यात आली.

Web Title: pimpri pune news Technology needs to be followed by childcare