भरमसाट वाहने; नियोजनशून्य व्यवस्था

रवींद्र जगधने
मंगळवार, 11 जुलै 2017

पिंपरी - शहरातील एकूण वाहन संख्येत दरवर्षी लाखो वाहनांची भर पडत आहे. मात्र, त्या तुलनेत महापालिका व पोलिस प्रशासनाकडून योग्य नियोजन व उपाययोजना होत नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम पोलिस कर्मचारी व नागरिकांवर होताना दिसतो.

पिंपरी - शहरातील एकूण वाहन संख्येत दरवर्षी लाखो वाहनांची भर पडत आहे. मात्र, त्या तुलनेत महापालिका व पोलिस प्रशासनाकडून योग्य नियोजन व उपाययोजना होत नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम पोलिस कर्मचारी व नागरिकांवर होताना दिसतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम नसल्याने नागरिकांना खासगी वाहतुकीचा किंवा स्वतःच्या मालकीच्या वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे शहरातील दुचाकी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. चौक व रस्त्यांवरील अतिक्रमणे वाढत असल्याने शहरातील रस्ते, चौक अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियमन करणे जिकिरीचे झाले आहे.

पार्किंगचा प्रश्‍न गंभीर 
शहरात दरवर्षी जवळपास दहा टक्‍क्‍यांनी वाहनांची संख्या वाढत आहे, त्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर थांबवली जातात. त्याचे उदाहरण म्हणजे काळेवाडीतील बंद बीआरटी मार्ग पार्किंगस्थळ बनले आहे. त्याचबरोबर अनेक कालबाह्य मर्यादा संपलेली वाहने रस्त्यावर धावत आहेत, तर असंख्य बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला पडून आहेत.   

वाहतूक पोलिसांना सुख-सुविधा नाहीत 
पोलिसांना वाहतूक नियमनासाठी चौक किंवा रस्त्यावर थांबावे लागते. मात्र, त्याठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते. पावसाळ्यात प्रशासनाकडून रेनकोट मिळत नाहीत. तर, यापेक्षा वाईट अवस्था महिला पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. पिंपरी, सांगवी, भोसरी व चिंचवड वाहतूक शाखेत महिला स्वच्छतागृह व महिला विश्रांतीगृहही नाही.

पिंपरी आरटीओमधील मार्च २०१७ पर्यंतची आकडेवारी
दुचाकींची संख्या       ११,६८,१३३
इतर वाहने      १५,६६,७११ 
मोटार      २,३५,६१० 
चारचाकी डिलिव्हरी व्हॅन     ३१,०५४
तीनचाकी डिलिव्हरी व्हॅन     २५,८८१ 
टुरिस्ट     २४,३६६ 
रिक्षा      ६,२८०

इतर एकूण सर्व वाहने 
२०१३    १०,४५,९८४        
२०१४    ११,५५,७८३       
२०१५    १२,८९,५२६       
२०१६    १४,२९,३०१     
२०१७     १५,६६,७११
२०१६-२०१७ मधील वाहने
दुचाकी    १,००,४३२
इतर वाहने    १,३७,४१०

नागरिकांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असते. वाहनांच्या पार्किंगची सुविधा महापालिकेने करणे गरजेचे आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी चौकात स्वच्छतागृहाची सुविधा असायला हवी. 
- किशोर म्हसवडे, वाहतूक निरीक्षक, सांगवी विभाग

Web Title: pimpri pune news vehicle traffic