लष्करही सरसावले जलसंधारणासाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पिंपळे गुरव परिसरातील शेकडो एकर जमिनीवर उपक्रम

पिंपरी - आतापर्यंत केवळ इमारती, बंगले या ठिकाणीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रम राबविला जात असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, आता भारतीय लष्करानेच या उपक्रमाला सहकार्याचा हात देत आपल्या मोकळ्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. रक्षक सोसायटी परिसराच्या लष्कर विभागाने त्यामध्ये पुढाकार घेतला असून, पिंपळे गुरव-सौदागरलगतच्या शेकडो एकर जमिनीवर हा उपक्रम राबविण्यास परवानगी दिली आहे. 

पिंपळे गुरव परिसरातील शेकडो एकर जमिनीवर उपक्रम

पिंपरी - आतापर्यंत केवळ इमारती, बंगले या ठिकाणीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रम राबविला जात असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, आता भारतीय लष्करानेच या उपक्रमाला सहकार्याचा हात देत आपल्या मोकळ्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. रक्षक सोसायटी परिसराच्या लष्कर विभागाने त्यामध्ये पुढाकार घेतला असून, पिंपळे गुरव-सौदागरलगतच्या शेकडो एकर जमिनीवर हा उपक्रम राबविण्यास परवानगी दिली आहे. 

लष्कराकडील मोकळ्या जमिनींच्या माध्यमातून ‘मृदा व जलसंधारणा’ची एक मोठी सामाजिक चळवळ उभारण्याची मोहीम पिंपळे सौदागरमधील काही पर्यावरणप्रेमींनी हाती घेतली आहे. अर्थात असा प्रयोग २००७ मध्येही करण्यात आला होता.  पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि कोरड्या पडलेल्या विंधन विहिरी (बोअरवेल्स) यामुळे पिंपळे सौदागर व गुरवकरांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. काळ्या बाजारातून पाणी खरेदी करताना नागरिकांच्या तोंडाला अक्षरश: फेस येतो. हे चित्र बदलायचे असेल तर मृदा व जलसंधारण होणे आवश्‍यक असल्याचे सचिन वाळुंज व संतोष मसकर यांच्या लक्षात आले. या दोन्ही परिसरांना वरदान म्हणून लाभलेल्या लष्कराच्या जमिनीचा त्यासाठी उपयोग करून घेता येईल, अशी कल्पनाही त्यांना सूचली. त्यातूनच त्यांनी रक्षक येथील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अर्थात, अपेक्षेप्रमाणे त्यांना लष्कराकडून नकारच मिळाला. तरीदेखील वाळुंज आणि मसकर यांनी त्यांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मात्र लष्कराने कोणतीही शंका न घेता परवानगी देऊ केली.

असा असेल प्रकल्प
या प्रकल्पासाठी लष्कराने आपल्याकडील शेकडो एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात काही एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्याअंतर्गत या मोकळ्या जमिनीवर तीन फूट खोलीचे सात ते दहा किलोमीटरपर्यंतचे अनेक चर खोदण्यात येतील. येत्या पावसाळ्यामध्ये या चऱ्यांमध्ये पाणी साठून ते मुरण्यास मदत होईल. 

जलसंधारणाबरोबर वृक्षलागवड
केवळ जलसंधारणाचे काम करून ते थांबणार नसून त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचाही वाळुंज आणि मसकर यांचा विचार आहे. चर खोदताना बाहेर काढली जाणारी माती चरांलगत ठेवून त्यावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या वृक्षारोपणामुळे झाडे जगण्याची हमी मिळत असल्याचे मसकर यांनी सांगितले.

‘मृदा व जलसंधारणा’ची गरज
ज्या वेळी पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडतो, तेव्हा तो माती सुट्टी करतो त्यानंतर दुसऱ्या थेंबाबरोबर माती वाहून जाण्यास सुरवात होते
हे मातीमिश्रित पाणी पुढे नदी आणि पर्यायाने धरणामध्ये जाते
वर्षानुवर्षे नदीमध्ये गाळ साठत जाऊन नदीची वहनक्षमता तर, धरणाची साठवण क्षमता कमी होते

परिणामी पूर येणे, धरण ओव्हरफ्लो होण्याचे प्रमाण वाढते
 पहिल्या टप्प्यातच ते थांबविल्यास ते पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास मदत होते. त्यातून भूजल पातळीही वाढते

हे काम आम्ही उभारले असले, तरी तरी त्याला लोकसहभागाची नितांत गरज आहे. शासकीय संस्था, संघटना, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून ही चळवळ पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- सचिन वाळुंज

पथदर्शी प्रकल्प म्हणून २००७ मध्ये आम्ही हा प्रकल्प छोट्या प्रमाणावर राबविला होता. त्याला यशही आले होते. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे तो पुढे नेता आला नाही. मात्र, या वर्षापासून तो व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
- संतोष मसकर

Web Title: pimpri pune news water conservation by army