जागा देण्याबाबत चालढकल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कचऱ्याच्या समस्येबाबत राज्य सरकारपाठोपाठ महापालिका फारशी गंभीर नसल्याने प्रस्ताव रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. वन खात्याशी चर्चा सुरू असून, कायदेशीर बाबींची पूर्तता करीत आहोत. त्यानंतर जागा ताब्यात येईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

पुणे - शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा महापालिकेला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेने कार्यवाही केली; परंतु वन खात्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जागेचा प्रस्ताव पुन्हा धूळ खात पडला आहे. 

कचऱ्याच्या समस्येबाबत राज्य सरकारपाठोपाठ महापालिका फारशी गंभीर नसल्याने प्रस्ताव रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. वन खात्याशी चर्चा सुरू असून, कायदेशीर बाबींची पूर्तता करीत आहोत. त्यानंतर जागा ताब्यात येईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरात रोज जमा होणारा कचरा आणि त्यावरील प्रक्रियेची यंत्रणा तोकडी असल्याने कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यातच, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा डेपो हलविण्याची मागणी लावून धरली आहे. महापालिकेच्या मागणीनुसार कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पिंपरी सांडस येथील १९.९ हेक्‍टर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी निर्णय चार मे २०१७ रोजी घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे तुळापूर येथील महापालिकेच्या ताब्यातील १९.९ हेक्‍टर इतकी जागा वन खात्याला देण्यात आली आहे. शिवाय, जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेचे शुल्कही महापालिकेने भरले आहे; परंतु गेल्या महिन्यात पिंपरी-सांडसमधील जागा महापालिकेला देण्याच्या हालचाली वन खाते करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

मुख्यमंत्र्यांचा निर्णय होऊन एक वर्षे संपत आले तरीही, वन खात्याच्या पातळीवर मात्र, कार्यवाही झाली नसल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ही जागा महापालिकेला मिळणार का, असा प्रश्‍न आहे. 

शहरात रोज जमा होणारा कचरा - 1600 टन
प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण - 850 टन
पिंपरी सांडस येथील जागा  - 19.9 हेक्‍टर

पिंपरी सांडस येथील जागा ताब्यात येणार असल्याने महापालिकेने कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. तुळापूरमधील महापालिकेची जागा वन खात्याला दिली आहे; परंतु महापालिकेला जागा मिळालेली नाही. वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. 
- सुरेश जगताप, विभाग प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन, महापालिका

Web Title: pimpri sandas place garbage depo issue