पिंपरीच्या विद्यार्थ्यांची नावे ‘मंगळा’वर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

तुम्हीही नोंदवू शकता नावे
‘रोव्हर २०२०’ हे यान ‘ॲटलस व्ही ५४१’ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेशल येथील सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते पाच ऑगस्ट २०२० मध्ये प्रक्षेपण केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळवार पोचण्याची शक्‍यता आहे. या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळवार पाठविण्यासाठी या  https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars२०२० या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०१९ रात्री पावणेबारापर्यंत नावाची नोंदणी करू शकता.

पिंपरी - अवकाश संशोधन करणाऱ्या ‘नासा’ या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्ष यान पुढील वर्षी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावणार आहे. या यानावरील स्टेनसील्ड चिपवर जगातील सर्वांना नावे पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याच अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नावे ‘मंगळा’वर जाणाऱ्या या यानाच्या माध्यमातून सुवर्णाक्षरात कोरली जाणार आहेत. त्यासाठी लागणारे ‘पासेस’ही ‘नासा’ने शाळेला पाठविल्याने शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाला आकाशही ठेंगणे पडले.

राज्यातील अनेक महापालिकांच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना पिंपरी महापालिकेच्या शाळांनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. म्हेत्रेवाडी क्र. ९२ प्राथमिक शाळांमधील तीस विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिक्षकांची तळमळ आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाचा विषय ठरत आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा ढोकले यांनी प्रोत्साहन दिले.

‘नासा’च्या पसाडेना (कॅलिफोर्निया) येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीत तसेच मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या (७५ नॅनोमीटर) रुंदीत ही नावे नोंदवून स्टेन्सिल केली जाणार आहेत. अशा या एक डेमी आकाराच्या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली ही नावे जतन करून मंगळावर पाठविली जाणार आहेत. या चिपवर तब्बल दहा लाख नावे मावतील. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या नागू बारणे मुले, विकासनगर आणि श्रमिक नगर, सोनवणे वस्ती या शाळांनीदेखील ऑनलाइन नावे नोंदविली आहेत. त्यांचे ऑनलाइन बोर्डिंग पासही उपलब्ध झाले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले.

‘नासा’च्या वॉशिंग्टन येथील सायन्स मिशनचे एसएमडी थॉमस झुरबुचेन यांच्या म्हणण्यानुसार, मंगळ अभियानासाठी रोव्हरची तयारी करीत असताना या नव्या मोहिमेची माहिती व्हावी, तसेच सर्वांना सहभागी होण्यासाठी मंगळावर नावे पाठविण्याची मोहीम सुरू केली आहे. यात तुर्की देश प्रथम स्थानी असून, भारत दुसऱ्या स्थानी आहे.

मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन रचनात्मक शिक्षण, सर्वस्पर्शी आकलन आणि प्रयोगशील ज्ञानसंवर्धन, या दिशेने महापालिका शाळेची वाटचाल सुरू आहे. ‘नासा’ने या चिमुकल्यांना संधी दिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.
- आनंदी जंगम, तंत्रस्नेही शिक्षिका, म्हेत्रेवाडी क्र.९२ प्राथमिक शाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Student Name on Mars Planet