पाणी पेटणार

ज्ञानेश्‍वर बिजले
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा

शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा

पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच महावितरणकडून वीजप्रवाह खंडित झाल्याने पाणी वितरणाचे वेळापत्रकात बिघडले. परिणामी, काही उंच भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला.
महापालिकेच्या यंत्रणेला मागणीएवढे पाणी वितरित करणे शक्‍य होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर राहुल जाधव, तसेच आमदार महेश लांडगे यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. त्या वेळी आठवडाभरात पाणीपुरवठा सुधारण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाकडून 12 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान पवना धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडल्यामुळे रावेत बंधाऱ्याजवळ पाणीउपसा करण्यासाठी पुरेशी पातळी उपलब्ध झाली नाही. त्यातच बुधवारी (ता. 17) व गुरुवारी (ता. 18) सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंप बंद पडले. त्या वेळी पवना नदीतून पाणी घेता आले नव्हते.

महापालिका सध्या रोज सरासरी 480 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी रावेत बंधाऱ्याजवळून घेते. गेल्या आठवड्यातील अडचणीमुळे हे प्रमाण 457 ते 473 एमएलडीपर्यंत घसरले. 12 ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत पाण्याचा उपसा कमी होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. टाकी भरण्याची प्रक्रिया सलग न झाल्याने पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे पाणी कमी दाबाने व अपुरे पोचले. काही ठिकाणी पाणीपुरवठा नेहमीपेक्षा कमी कालावधीसाठी झाला. काही भागांत पाणी न मिळाल्याने महिलांना लांबून पाणी आणावे लागले, तर काही भागात टॅंकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागला.

याबाबत रावेत पंपहाऊस येथील उपअभियंता विशाल कांबळे म्हणाले, ""12 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत, 13 ऑक्‍टोबरला सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत, तर 14 ऑक्‍टोबरला रात्री साडेनऊपासून 15 ऑक्‍टोबरला पहाटे पावणेसहा वाजेपर्यंत रावेत बंधारा येथील पाणीपातळी कमी होती. रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाऊ नये, या उद्देशाने नियोजन करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. प्रतितासाला 20 एमएलडी पाणी उचलले जाते. पातळी कमी असल्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. त्यामुळे त्या काळात कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला.''

तर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण म्हणाले, ""बुधवारी सकाळी पाच वाजून 40 मिनिटांपासून सहा वाजून 50 मिनिटांपर्यंत रावेत पंपहाऊसचा वीजपुरवठा बंद पडला होता. जोरदार पावसामुळे महावितरणने शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी साडेसातपासून आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला होता.''

पाणीपुरवठा 24 तास सुरू ठेवावा लागतो. त्यात काही अडचण आल्यास तो विस्कळित होतो. चढावरील भागात पाणी पोचत नाही. सलग दोन-चार दिवस अडचण आल्यास परिस्थिती बिकट होते. टाकीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास पाण्याचा दाब कमी होतो. अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी ही अडचण आली.
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

गेल्या आठवड्यातील पाणीपुरवठा (एमएलडीमध्ये)
तारीख पाण्याचे प्रमाण
11 ऑक्‍टोबर 484
12 ऑक्‍टोबर 473
13 ऑक्‍टोबर 472
14 ऑक्‍टोबर 461
15 ऑक्‍टोबर 454
16 ऑक्‍टोबर 470
17 ऑक्‍टोबर 457
18 ऑक्‍टोबर 467

Web Title: pimpri - water problem will be increased soon in the city