खेडमधील पिंगळे कुटुंबाची दैव पाहतंय सत्त्वपरीक्षा!

रुपेश बुट्टे
बुधवार, 9 मे 2018

आंबेठाण - एखाद्याच्या मागे साप लागावा, त्यातून वाचण्यासाठी त्याने पळावे, पळताना जंगल लागावे आणि पाठीमागे वाघ यावा, त्यातून जीव वाचवत असताना पाण्यात पडावे आणि तेथे मगर असावी, अशी संकटांची भयानक मालिका एखाद्याच्या आयुष्यात आली तर? हो, मन हेलावून टाकणारी संकटांची अशीच मालिका खेड तालुक्‍यातील देशमुखवाडी येथील पिंगळे कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे.

आंबेठाण - एखाद्याच्या मागे साप लागावा, त्यातून वाचण्यासाठी त्याने पळावे, पळताना जंगल लागावे आणि पाठीमागे वाघ यावा, त्यातून जीव वाचवत असताना पाण्यात पडावे आणि तेथे मगर असावी, अशी संकटांची भयानक मालिका एखाद्याच्या आयुष्यात आली तर? हो, मन हेलावून टाकणारी संकटांची अशीच मालिका खेड तालुक्‍यातील देशमुखवाडी येथील पिंगळे कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे.

सरकार दरबारी प्रलंबित असणारी भामा आसखेड पुनर्वसनाची कामे आटोपून घरी येत असताना वडिलांचा आणि मुलाचा अपघात होतो. त्यात जबर मार लागल्याने मुलाचा मृत्यू होतो आणि त्याच्या दशक्रिया विधीच्या दिवशी जखमी वडिलांचाही मृत्यू होतो. महेंद्र मारुती पिंगळे (वय ३७) व मारुती महादू पिंगळे (वय ६५) हे ते दुर्दैवी पिता-पुत्र आहेत.

पिंगळे पिता-पुत्र राजगुरुनगरवरून कामे आटोपून घरी येत असताना धामणे फाटा-कोये (ता. खेड) येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना दवाखान्यात नेले. त्यानंतर दोन दिवसांनी (२७ एप्रिल) मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर एकीकडे मुलाच्या दशक्रिया विधीची तयारी सुरू असताना वडिलांच्या निधनाची (५ मे) बातमी गावात येऊन धडकली आणि अवघे गावच सुन्न झाले. त्यामुळे वडील आणि मुलगा यांचा दशक्रिया विधी एकाच दिवशी अन्‌ एकत्र (ता. ९) करण्याची दुर्दैवी परिस्थिती पिंगळे कुटुंबासह देशमुखवाडी ग्रामस्थांवर आली आहे.

मुलगा महेंद्र याच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली, आई असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबात आता कर्ता पुरुष राहिला नसल्याने एक प्रकारे आख्खे कुटुंब क्षणात उघडे पडले आहे.

आर्थिक मदतीची गरज
घरातील कमावती आणि आधार असणारी माणसे गेल्याने एका क्षणात हे कुटुंब निराधार झाले आहे. उद्या (ता. ९) या दोन्ही दशक्रिया विधी असल्याने बहुतांश पुढारी उपस्थित राहतील, परंतु या कुटुंबाला भाषणबाजीची गरज नसून, सध्या मानसिक आणि आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे. आजकाल दशक्रिया विधी म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. स्वतःच्या मोठेपणासाठी विविध पक्षांच्या नेतेमंडळींना आमंत्रित करण्याची पद्धत रूढ झाली आहे. परंतु, समाजात अशी एखादी दुर्दैवी घटना घडली; तर किती नेतेमंडळी स्वतःहून अशा कुटुंबाच्या आधारासाठी जातील आणि अशा कुटुंबाला मदतीचा हात पुढे करतील? सध्या सर्वत्र लग्नकार्याची धामधूम सुरू आहे. सर्वत्र वायफळ खर्च करून संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू आहे. परंतु, हे सर्व बाजूला ठेवून अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी  किती दानशूर हात पुढे येतील, हे या दशक्रियाविधीच्या निमित्ताने पाहता येईल.

Web Title: pingale family in khed