शहरात पाइपलाइन गॅस "वेटिंग'वर 

Gas-Pipe-Line
Gas-Pipe-Line

पिंपरी - शहरातील नागरिकांना पाइपलाइन गॅस हवा आहे. केंद्र सरकारही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करीत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शहरातल्या तब्बल 150 हाउसिंग सोसायट्यांमधील 25 हजार नागरिकांना पाइपलाइन गॅस मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टवर थांबावे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. 

पाइपलाइन गॅसची सुविधा घरापर्यंत पोचवण्यासाठी रस्त्यावर खोदाई करणे गरजेचे आहे. या कामासाठी महापालिका एका मीटरला 12 हजार रुपये आकारते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) शहरात 60 किलोमीटर रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला 72 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. परंतु हा खर्च एमएनजीएलला परवडणारा नसल्याने नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस देणे कंपनीला कठीण झाले आहे. या कामासाठी कंपनीने पालिकेकडे आजवर 80 अर्ज केले आहेत. 

शहरात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, थेरगाव, दापोडी या भागांत पाइपलाइन गॅस टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने या भागांतील नागरिकांना ही सुविधा मिळत आहे. मात्र, खोदाईच्या कामातील अडचणीमुळे एमएनजीएलने पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, मोशी, चऱ्होली या भागांतील कामे बंद केल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

गेल्या वर्षी केंद्र सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख घरांपर्यंत पाइपलाइन गॅस पोचवण्याचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात पुण्यात 42 हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 10 हजार घरांनाच ही सुविधा देणे शक्‍य झाले. यावर्षी देखील एक लाख घरांपर्यंत पोचण्याची सूचना पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये खोदकामाची मोठी अडचण असल्याने हे काम कसे पूर्ण करायचे, असा प्रश्‍न कंपनीसमोर उभा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र 
शहरामध्ये पाइपलाइन गॅसचे काम करताना असंख्य अडचणी येत असल्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शहरात किती ठिकाणाहून पाइपलाइन गॅसला मागणी आहे. आतापर्यंत किती काम झाले आहे, याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे, असे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी सांगितले. 

""पिंपरी महापालिकेकडून आकारण्यात येणारा रस्ते खोदाईचा दर खूप जास्त आहे. त्यामुळे शहरात काम करणे कंपनीला शक्‍य नाही. पुणे महापालिका रस्ते खोदाईसाठी एक मीटरला दोन हजार 774 रुपये आकारते. तेच दर या महापालिकेने आकारावेत, अशी मागणी पालिका आयुक्‍तांकडे केली आहे.'' 
- अरविंद तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 

""रस्ते खोदाई संदर्भात महापालिका प्रशासनाने धोरण तयार केले आहे. एमएनजीएलने पाइपलाइन गॅसचे काम करण्यासाठी खोदाई शुल्क कमी करावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे विचारासाठी ठेवण्यात आला आहे.'' 
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड महापालिका 

शहरात पाइपलाइन गॅस ग्राहक 28,000 
एलपीजी ग्राहक 4,00,000 
पिंपरी-चिंचवडमध्ये पाइपलाइन गॅसचा रोजचा पुरवठा 10,000 किलो, महिन्याला 3,00,000 किलो 

रस्ते खोदाईचे दर (एक मीटरसाठी) 
पिंपरी-चिंचवड महापालिका - 12,000 रुपये 
पुणे महापालिका- 2,774 रुपये 
नागपूर महापालिका- 1,400 रुपये 
गुजरातमधील महापालिका - दरवर्षी देखभाल खर्चापोटी 10 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com