पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणास उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

गवंडीकाम करणारा नवनाथ पोळ याच्याकडे विना तिकिट रेल्वे प्रवास केल्याप्रकरणी दंड भरायला पैसे नव्हते.

दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे स्थानकावर तिकिट तपासणीस राजेंद्र काटकर यांनी विना तिकिट प्रवास करणाऱ्या नवनाथ पोळ यास रेल्वे सुरक्षा दलाच्या साह्याने पकडून ठेवले होते; परंतु त्याने रेल्वे अधिकारी व रेल्वे सुरक्षा दलाशी हुज्जत घातली. रेल्वे सुरक्षा दलाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९ एमएम बनावटीचे विदेशी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक मोबाईल संच असा एकूण चाळीस हजार रूपयांचा ऐवज आढळून आला असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रेय खोत यांनी दिली.

या बाबत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार सेवक सयाम यांनी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्याच्याविरूध्द आर्म अॅक्ट व भारतीय रेल्वे कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ पोळ याच्याकडे सदर पिस्तूल कोठून आले? व पिस्तूल बाळगण्यामागील त्याचा उद्देश स्पष्ट झालेला नसून पोलिस त्या कारणांचा शोध घेत आहेत, अशी माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली. 

पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे अपर अधीक्षक तुषार पाटील, उप अधीक्षक नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ताराचंद सुडगे पुढील तपास करीत आहेत.

खिशात पिस्तूल, पण दंड भरायला पैसे नाही
गवंडीकाम करणारा नवनाथ पोळ याच्याकडे विना तिकिट रेल्वे प्रवास केल्याप्रकरणी दंड भरायला पैसे नव्हते. तिकिट तपासणीस यांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर तो पळून जाऊ लागल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या साह्याने त्याला पकडण्यात आले. झडतीमध्ये पिस्तूल, जिवंत काडतूस व मोबाइल संच सापडल्याने रेल्वे प्रशासन अवाक झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pistol seized from a youth at Uruli Kanchan railway station