नियोजन खड्ड्यात

pimpri-pit
pimpri-pit

पिंपरी - पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा पाऊस व वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे पडतात. पाऊस लांबल्याने डांबरीकरणास विलंब. विविध वाहिन्यांच्या कामासाठी खोदाई केलेल्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करता येत नाही, अशी उत्तरे प्रशासनाकडून शहरातील खड्ड्यांबाबत दिले जातात. 

वास्तविक निकृष्ट कामांमुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजविण्याचा दिखावा केला जातो. निमित्त मात्र, पावसाचे केले जाते. विविध वाहिन्यांचे काम झाल्यानंतरही खोदाई केलेल्या ठिकाणी डांबरीकरण केले जात नाही. वेगवेगळ्या विभागांतील समन्वयाअभावी विविध कामांसाठी एकच रस्ता पुन्हा पुन्हा खोदला जातो. परिणामी, खड्ड्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचे दिसून आले.

पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या, पावसाळी नलिका टाकण्याची कामे पालिकेतर्फे सुरू आहेत. सेवा वाहिन्या टाकण्यासाठी विविध कंपन्यांकडून रस्ते खोदाई केली जाते. सेवा वाहिन्यांसाठी एकदाच पाइप टाकून ठराविक अंतरावर ‘डक्‍ट’ ठेवले जातील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र, आळंदी-पुणे, देहू-आळंदी असे दोन-तीन ठराविक रस्ते सोडल्यास ‘डक्‍ट’ची सोय अन्य रस्त्यांवर दिसत नाही. परिणामी, वेगवेगळ्या कंपन्यांकडून वारंवार रस्ते खोदाई केली जाते. काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरण वेळेवर केले जात नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यात या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. यात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याची कारणे अनेक आहेत. त्यावर उपाययोजना करताना प्रशासन कमी पडल्याचे दिसते. 

पावसामुळे खड्डे
शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले. ते बुजविण्यासाठी डांबर किंवा काँक्रिटऐवजी खडी, मुरूम, माती, विटांचे तुकडे, दगड, पेव्हिंग ब्लॉकचे तुकड्यांचा वापर केला. परिणामी, पुन्हा खड्डे पडून पाऊस झाल्यावर चिखल व ऊन पडल्यावर धुळीचा सामना करावा लागला. 

मेट्रोच्या कामाची भर
पुणे-मुंबई महामार्गावर दापोडीपासून चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेटपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. अवजड क्रेन, पिलर उभारण्यासाठी खोदाई केल्याने मुख्य मार्गासह सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. कासारवाडीतील रस्ता अजूनही खचलेल्या अवस्थेत आहे. 

५ महिन्यांपासून खोदाई
विविध सेवा वाहिन्यांसाठी अनेक ठिकाणी पाच-सहा महिन्यांपासून खोदाई केली आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटी परिसर, वाकडमधील कस्पटे वस्ती, पिंपळे गुरवमधील राजीव गांधी वसाहत परिसर आदी ठिकाणी उन्हाळ्यात सुरू झालेली कामे अद्याप अपूर्ण आहेत. 

अंतर्गत चर धोकादायक
नळजोड, विविध सेवा केबल घेण्यासाठी अनेक रस्त्यांवर रातोरात खोदकाम केले जाते. केबल टाकल्यानंतर संबंधित चर मातीने बुजवला जातो. असे चर दोन-चार इंच रुंदीचे असल्याने फारसे धोकादायक वाटत नाहीत. मात्र, वाहनांची वर्दळ व पाण्यामुळे चराच्या ठिकाणी खड्डे पडले असल्याचे चित्र अंतर्गत रस्त्यांवर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com