कोंढव्यातील 'या' रस्त्यावर आणखी किती अपघात होणार?

कोंढव्यातील 'या' रस्त्यावर आणखी किती अपघात होणार?

हडपसर (पुणे) : कोंढवा येथील खडीमशिन चौकापासून मंतरवाडी या बाह्यवळण मार्गावरील सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम नऊ महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गुरवारी (ता. ६) या मार्गावर खड्डे चुकविताना शंकर पवार (वय २३) व सतीश जाधव (वय २५, दोघेही रा. सासवड) हे दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. दरम्यान या रस्त्याच्या कामाचे थकलेले बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न मिळाल्यामुळे ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. 

या अवजड वाहतुकीच्या मार्गावरील पिसोळी, उंड्री आणि हांडेवाडी येथे रस्त्याची कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी ही दररोजची डोकेदुखी झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीवच धोक्यात आला आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर परिस्थिती ओढावली आहे. 

खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम झाले. परंतु, पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ काम अर्धवट ठेवले आहे. पद्मावती मंदिर ते जगदंब भवन चौकापर्यंत खड्ड्यांमुळे रहिवाशांसह चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जगदंब भवन चौकापासून पुढे काही अंतरापर्यंत कॉंक्रीटीकरण झाले आहे. मात्र, उंड्री चौकाच्या अलीकडे आणि पुढे काही अंतरापर्यंत काम रखडले आहे. या भागात खड्डे आणि अतिक्रमणांमुळे कोंडी होत आहे. उंड्रीपासून पुढे हांडेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे काम झाले. परंतु, हांडेवाडी चौकाच्या पुढे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तेथून ऊरूळी देवाची येथील कचरा डेपोच्या अलीकडे काही अंतरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण झाले. कचरा डेपोसमोर डांबरी रस्ता असून, त्यापुढे ऊरूळी देवाचीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. परंतु, मंतरवाडी चौकाजवळ काम रखडले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत दुभाजक नाही. पद्मावती मंदिराजवळ मोठे खड्डे पडले आहेत. येथे नुकत्याच एका अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला. परंतु, अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही, तसेच विजेअभावी रात्री खड्डे दिसत नाहीत. 

उड्रीतील रहिवासी संतोष खरात म्हणाले, की पिसोळी, उंड्री आणि हांडेवाडीत नवीन सोसायट्यांमुळे नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. परिणामी सेवा रस्त्याची गरज भासत आहे. नागरिकांना खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागतो. खड्डे तातडीने बुजवावेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सुरक्षित रस्त्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले, की या मार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदाराचे बिल थकले आहे. त्यामुळे या मार्गाचे काम ठेकेदाराने बंद ठेवले आहे. ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. पथदिवे संबधित ग्रामपंचायतींनी बसविणे अपेक्षित आहे. खडीमशिन ते पिसोळीपर्यंत रस्त्याची रूंदी कमी असल्यामुळे दुभाजक बसविले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com