रिंगरोडसाठी साडेसातशे हेक्‍टर भूसंपादन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

या गावात होणार भूसंपादन

  • भोर तालुका - केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे
  • हवेली तालुका - रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली.
  • मुळशी तालुका - कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.
  • मावळ तालुका - पाचणे, चांदखेड, बेबडओहोळ, धामणे, परंदवाडी उर्से

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग-पौड-खेड शिवापूरदरम्यानच्या रिंगरोडसाठी सुमारे साडेसातशे हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लवकरच भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

एमएसआरडीसीच्या रिंग रोडला सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘विशेष राज्य महामार्ग-१’चा दर्जा नुकताच दिला आहे. त्याबाबतचे आदेश (गॅझेट) खात्याकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गानंतर ‘विशेष महामार्ग-१’ दर्जा मिळणारा राज्यातील हा दुसरा महामार्ग ठरला आहे. हा मार्ग सुमारे ७० किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी साडेसातशे हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रिंग रोड २००७ पासून प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित होता. ऑगस्ट २०११ मध्ये शासनाने एमएसआरडीसीच्या रिंग रोडला मान्यता दिली. शासनाकडून रिंग रोडच्या अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसी नियुक्ती केली. या सर्व प्रक्रियेदरम्यान एमएसआरडीसीसमोर अनेक अडथळे आले. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंग रोडऐवजी नव्याने रिंग रोडची आखणी करण्यात आली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दोन रिंग रोड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

नव्याने आखण्यात आलेल्या रिंग रोडच्या सर्वेक्षणाचे काम झाल्यामुळे तो राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या रिंग रोडला विशेष राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (पीडब्ल्यूडी) पाठविण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून घेण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘विशेष राज्य महामार्ग-१’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्याबाबतचे आदेश (गॅझेट) राज्य सरकारचे उपसचिव बी. पी. साळुंके यांनी काढले आहेत.

पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटरचे काम
जिल्ह्यातून तालुक्‍यांच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यांना राज्य महामार्गाचा दर्जा दिला जातो. एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्प्यात सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. खेडशिवापूरपासून निघणारा हा रिंग रोड पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला येऊन जोडणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Place for Ringroad MSRDC