
Deccan College : पुणे परिसर दर्शन : पुण्याची शान डेक्कन कॉलेज
भारतातील तिसरे सगळ्यात जुने महाविद्यालय म्हणजे डेक्कन कॉलेज, हे पुण्यात ६ ऑक्टोबर १८२१ रोजी चालू झाले. त्यावेळी त्याचे नाव ‘हिंदू कॉलेज’ होते. मुंबई इलाख्याचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्या पुढाकाराने हे चालू झाले. सरदार खंडेराव दाभाडे यांनी सुरू केलेला व पुढे पेशव्यांनी संस्कृत शिक्षणासाठी चालू ठेवलेला दक्षिणा फंड यासाठी वापरण्यात आला. ७ जून १८५१ मध्ये महाविद्यालयाचे नाव बदलून ‘पूना कॉलेज’, तर पुढे ऑक्टोबर १८६४ मध्ये ‘डेक्कन कॉलेज’ असे नामकरण झाले.
२३ मार्च १८६८ रोजी येरवड्यातील ११५ एकर जागेमधील नवीन इमारतीत त्याचे स्थलांतर झाले. यासाठी सर जमशेदजी जीजीभॉय यांनी एक लाखांची मदत केली होती. कॉलेजची मुख्य इमारत गॉथिक आर्किटेक्चरमध्ये बांधली आहे. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, लोकमान्य टिळक, गुरुदेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर, वि. का. राजवाडे, चीनमध्ये प्रसिद्धीस आलेले डॉ. कोटणीस असे अनेक हुशार विद्यार्थी या कॉलेजने दिले.
विशेष म्हणजे १९३४ मध्ये ब्रिटिशांनी हे कॉलेज बंद केले होते; पण लोकांनी आंदोलन करून आणि माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर ब्रिटिशांनी १७ ऑगस्ट १९३९ मध्ये परत चालू केले. गेल्या पन्नास वर्षांत पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासह पुरातन भारतीय इतिहास व संस्कृती, मध्ययुगीन आणि मराठा इतिहास, भाषा, संस्कृतमधील अभ्यास आणि पुरातत्त्व शास्त्राविषयी भरपूर संशोधन येथे झाले आहे. शिक्षणाव्यतिरिक्त येथे दोन संग्रहालये आहेत.
एका संग्रहालयात उत्खननात सापडलेल्या पंधरा ते वीस लाख वर्षांपूर्वीपासून ते दोन हजार वर्षांपर्यंतच्या वस्तू जसे की हत्यारे, भांडी, मणी, बांगड्या आणि इतर दागिने, प्राण्यांचे सांगाडे ठेवलेले आहेत. उत्खनन चालू केल्यानंतर जसजसे जमिनीखाली जातो, तसतसे जमिनीच्या वेगवेगळ्या थरात काय काय मिळत जाते, याची कल्पना यावी म्हणून एक मॉडेल बनवून ठेवले आहे. पुणे जिल्ह्यातील इनामगाव येथील संशोधनाचे मॉडेलसुद्धा बनवून ठेवले आहे.
दुसऱ्या संग्रहालयात मराठा व इतर इतिहास हा विषय हाताळला आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तसेच पेशव्यांची हस्तलिखिते, पत्रे, रुमाल, शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तू ठेवलेल्या आहेत. तसेच जमखिंडीकर पटवर्धनांच्या वस्तूंचा संग्रह येथेच पाहायला मिळतो.
काय पहाल?
गॉथिक आर्किटेक्चर असलेली इमारत, वस्तू संग्रहालये. संग्रहालय प्रवेश माफक शुल्क देऊन बघता येतात. वेळ सकाळी १० ते ५.३०
कसे पोहचाल
डेक्कन कॉलेजला पीएमपी बस अथवा खासगी बसने जाता येते.
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक